टिपर-कारच्या धडकेत कार मधील तिघेजण जखमी

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : दारू पिवून टिपर चालवून कारला धडक दिली. त्या अपघातात कार मधील तिघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात ११ मे ला सायंकाळी पावणेसात वाजता मांजरगाव येथे घडला आहे. या प्रकरणी राहुल रमेश घोगरे (रा. शेलगाव वांगी, ह. रा. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की ११ मे ला मी टाटा नॅक्सोन कंपनीच्या कारने माझ्या गावी शेलगाव (वांगी) येथे आलो होतो. माझे काम उरकून परत पुणे कडे जात असताना मांजरगाव जवळ सायंकाळी पावणेसातच्या सुमारास दहा टायरचा टिपर एमएच १६ सीपी ४८१३ च्या चालकाने टिपर हा वेडावाकडा चालवत येऊन आमच्या कारला त्याने धडक दिली.

त्यामुळे आमची गाडी रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. त्यामुळे माझ्या मानेला लागले तर माझी पत्नी किशोरी हिच्या डाव्या पायाला तर मुलगा सत्यम याच्या डाव्या हाताला मार लागून आम्ही जखमी झालो आहोत. सदर चालकाने मद्यप्राशन करून टिपर चालवला होता. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.




