करमाळा येथील कै. नामदेवराव जगताप उर्दू शाळेचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

करमाळा(दि.१३) : आज इयत्ता दहावीचा निकाल लागला असून करमाळा शहरातील नव्याने मान्यता प्राप्त कै. नामदेवराव जगताप उर्दू शाळेने आपल्या पहिल्याच वर्षी शंभर टक्के निकाल देत घवघवीत यश संपादन केले आहे. यंदा शाळेतील चौदा विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.

शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मिस्बा याकुब कुरेशी हिने ८८% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. दुसऱ्या क्रमांकावर सबिया सादिक शेख (८५%) तर तिसऱ्या क्रमांकावर रफिया अकील शेख (७७%) हिने यश संपादन केले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे कुराण हाफीज मौलाना अब्दुल्ला शेख याने ७०% गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहेत.


शाळेचे मुख्याध्यापक श्री. जुबेर जानवडकर, सर्व शिक्षकवर्ग, पालक व ‘सन राईज क्लासेस’चे प्रा. इब्राहिम मुजावर सर यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाल्याचे सांगण्यात आले.
या यशाबद्दल मुस्लीम समाजात मोठा आनंद व्यक्त करण्यात येत असून यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.




