🇮🇳 शहीद जवान हवालदार आप्पासाहेब काटे : कुंभेजच्या मातीतून घडलेला भारतमातेचा वीर सुपुत्र 🇮🇳 - Saptahik Sandesh

🇮🇳 शहीद जवान हवालदार आप्पासाहेब काटे : कुंभेजच्या मातीतून घडलेला भारतमातेचा वीर सुपुत्र 🇮🇳

0

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२४: तालुक्यातील ‘कुंभेज’ या छोट्याशा गावाने देशसेवेसाठी अनेक सैनिक दिले आहेत. त्याच पवित्र भूमीत ७ जून १९७७ रोजी एका गरीब पण स्वाभिमानी कुटुंबात जन्म झाला तो भारतमातेच्या वीर सुपुत्र हवालदार आप्पासाहेब काटे यांचा.
त्यांचे लहानपण अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत गेले. वडील रोजंदारीवर तर आई दुसऱ्यांच्या शेतात खुरपणी करून संसाराचा गाडा ओढत होते. घरात आई-वडील, दोन बहिणी आणि दोन भाऊ असा मोठा परिवार. परिस्थिती कठीण होती, पण मनात एक स्वप्न होते – देशसेवेचे!
प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, कुंभेज येथे तर माध्यमिक शिक्षण भारत हायस्कूल, जेऊर येथे झाले. शालेय जीवनातच देशभक्तीची ज्योत त्यांच्या मनात प्रज्वलित झाली होती. गावातील सैनिकांकडे पाहून त्यांच्या मनातही गणवेश परिधान करून देशसेवा करण्याची प्रेरणा निर्माण झाली.

अखेर ८ मे १९९९ हा सुवर्णक्षण उगवला. सैन्य भरतीची संधी मिळाली आणि एक वर्षाचे कठोर प्रशिक्षण पूर्ण करून ते १६९ आर्टिलरी रेजिमेंटमध्ये गनर म्हणून भारतीय सैन्यात दाखल झाले.
त्यांची पहिली नियुक्ती आसाम येथे, त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये झाली. दहशतवादविरोधी कारवायांमध्ये त्यांनी धैर्याने सहभाग घेतला. अनेकदा शत्रूच्या गोळीबाराला सामोरे जात देशसेवेचे व्रत त्यांनी अखंडपणे जपले.
दरम्यान, कुंभेजच्याच कन्या राणी शिंदे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. संसाराची जबाबदारी सांभाळत असतानाच देशसेवेसाठी ते सदैव तत्पर राहिले. त्यांना दोन कन्या आणि एक पुत्र अशी तीन अपत्ये झाली.
काळाच्या ओघात वडिलांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. एकीकडे कुटुंबाचा आधारस्तंभ आणि दुसरीकडे राष्ट्ररक्षणाचे कर्तव्य – दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या.
सैन्यसेवेतील त्यांच्या प्रवासात श्रीनगर कॅन्ट येथे त्यांची भेट गावातीलच सैनिक म्हणजे सध्याचे आजी-माजी सैनिक संघटणेचे अध्यक्ष अक्रूर शिंदे यांच्याशी झाली. हजारो किलोमीटर दूर असलेल्या काश्मीरच्या भूमीत दोन गावकरी मित्र भेटले आणि जणू “शोले” चित्रपटातील जय-वीरूची मैत्री पुन्हा जिवंत झाली. गावच्या आठवणी, घरच्या गप्पा आणि देशसेवेची निष्ठा या सगळ्यांनी त्यांचे सैनिक जीवन अधिक समृद्ध केले.
सेवेतील १९ वर्षे पूर्ण करून ते हवालदार पदावर कार्यरत होते. त्यावेळी त्यांची नियुक्ती जम्मू-काश्मीरमधील संवेदनशील राजौरी सेक्टर येथे होती.परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते…
२४ जून २०१६.रोजी
राजौरी येथे पॅराग्लायडिंग जंपचे युद्धसराव प्रशिक्षण सुरू होते. आकाशातून उडी घेतल्यानंतर त्यांचा पॅराशूट उघडला नाही. सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. काही क्षणांतच हा वीर जवान वेगाने जमिनीकडे कोसळला. प्रशिक्षण पथकाने तत्काळ त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, परंतु वाटेतच त्यांच्या जीवनाची ज्योत मालवली.
भारतमातेचा हा शूर पुत्र देशसेवेच्या कर्तव्यावर असतानाच अमर झाला…
ही दुःखद वार्ता कुंभेज गावात पोहोचताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला. जम्मू-काश्मीरहून त्यांचे पार्थिव विमानाने पुण्यात आणण्यात आले. दुसऱ्या दिवशी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कुंभेज येथे त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.
“शहीद जवान आप्पासाहेब काटे अमर रहे!”
या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी गावकऱ्यांनी आपल्या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप दिला. शासकीय इतमामात, सशस्त्र सलामीसह त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आज त्यांना जावून दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात यासाठी कुंभेज ग्रामस्थ, आजी-माजी सैनिक आणि सर्व समाजबांधवांच्या लोकसहभागातून भव्य शहीद स्मारक उभारण्यात आले आहे.
त्यांच्या पश्चात वीरमाता सोनाबाई काटे, वीरपत्नी राणी काटे, कन्या साक्षी आणि श्वेता, तसेच पुत्र वेदांत असा परिवार आहे. त्यांची एक कन्या केरळमध्ये एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेत असून दुसरी डी.फार्मसीचे शिक्षण घेत आहे. पुत्र वेदांत पुण्यातील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे.
हा परिवार आजही अभिमानाने सांगतो –
“आमचे आप्पासाहेब गेले नाहीत, ते भारतमातेच्या इतिहासात अमर झाले आहेत.”
देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या वीर जवानाच्या शौर्याला, त्यागाला आणि राष्ट्रनिष्ठेला कोटी कोटी प्रणाम!
💐 शहीद अप्पासाहेब काटे यांचे स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली! 💐
🇮🇳 शहीद जवान हवालदार आप्पासाहेब काटे अमर रहे! 🇮🇳
🇮🇳 भारत माता की जय! 🇮🇳
🇮🇳

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!