पैशांपेक्षा संस्कारांची श्रीमंती मोठी : अरविंद जगताप

करमाळा (प्रतिनिधी) : माणसाची सुंदरता ही त्याच्या मातापित्यांचे त्याच्या व्यक्तिमत्त्वातील प्रतिबिंब असते. पैशांपेक्षा संस्कारांची श्रीमंती मोठी आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक, कवी व चित्रपट लेखक अरविंद जगताप यांनी केले.
सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित बौद्धिक व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात बोलताना त्यांनी समाजमाध्यमांतून मिळणाऱ्या उथळ ज्ञानापेक्षा संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. आपल्या खुमासदार व विनोदी शैलीत सामाजिक वास्तवावर उपरोधिक भाष्य करत त्यांनी उपस्थित श्रोत्यांना अंतर्मुख केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्लॅमोवेल वेलनेसच्या संचालिका डॉ. प्रचिती पुंडे होत्या. मानवी मन आणि बुद्धी यांच्यातील संतुलन महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुरेश शिंदे, डॉ. गणेश करे पाटील, कल्याणराव साळुंखे, बाळकृष्ण लावंड, अमरजीत साळुंखे, अण्णा काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सर्वोदयचे अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विष्णू शिंदे यांनी केले, तर आभार अजित कणसे यांनी मानले. तीन दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेला रसिक श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.


