कुणबी जात प्रमाणपत्रासाठी टिपणी व सर्कल चौकशीची जाचक अट रद्द करण्याची मागणी

करमाळा (प्रतिनिधी):कुणबी (ओबीसी) जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्जदारांना करावी लागणारी टिपणी व सर्कल चौकशीची जाचक अट तात्काळ रद्द करावी, अशी मागणी हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक तथा नेरलेचे माजी सरपंच श्रीमंत औदुंबरराजे भोसले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी दि. २० जुलै २०२६ रोजी तहसीलदारांना लेखी निवेदन सादर केले.
भोसले यांनी निवेदनात म्हटले आहे की, कुणबी (ओबीसी) जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर सर्कल चौकशी करण्यात येते. त्यानंतर टिपणी तयार करून ती प्रांत अधिकाऱ्यांकडून मंजूर करून घ्यावी लागते. या प्रक्रियेमुळे नागरिकांना अनेक महिने सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागतात.
त्यांच्या म्हणण्यानुसार, जात प्रमाणपत्र देताना १९६७ पूर्वीच्या कुटुंबीयांच्या व्यवसायाच्या नोंदी व उपलब्ध पुरावे ग्राह्य धरले जातात. आज अर्जदार कोणता व्यवसाय करतो, यावर जात प्रमाणपत्र दिले जात नाही. बहुतांश ओबीसी नागरिक १९६७ पूर्वीचा पारंपरिक व्यवसाय करत नसले, तरी त्यांचे त्या काळातील पुरावे ग्राह्य धरले जातात. त्यामुळे १९६७ पूर्वीचा वैध पुरावा उपलब्ध असताना सर्कल चौकशी व टिपणीची आवश्यकता नसल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
ही अट इतर जिल्ह्यांमध्ये नसून नियमानुसारही नसल्याचा दावा करत, नागरिकांना सहज व वेळेत जात प्रमाणपत्र उपलब्ध व्हावे यासाठी ही जाचक अट तातडीने रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या निवेदनावर राजुरी ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ. अमोल दुरंदे, आबासाहेब टापरे, ॲड. सविताताई शिंदे, मानसिंगराव खंडागळे, डॉ. जयंत कापडी, स्वप्निल जाधव, नानासाहेब जगताप (नेरले) आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
टिपणी व सर्कल चौकशीची ही जाचक व नियमबाह्य अट तातडीने रद्द न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्रीमंत औदुंबरराजे भोसले यांनी दिला आहे.



