करमाळ्याचा आणखी एक हिरा हरपला…

करमाळा तालुका ही गुणी माणसांची खाण आहे. या मातीत अनेक कलावंत, शिक्षक, साहित्यिक आणि विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारी माणसे जन्माला आली. मात्र काळाच्या ओघात एक-एक माणसे आपल्यातून निघून जात आहेत. नुकतेच लक्ष्मण उत्तम कांबळे उर्फ ‘एल. यु.’ यांच्या निधनाने असाच एक गुणी, कलासक्त आणि मनमिळाऊ हिरा हरपला आहे.


‘एल. यु.’ म्हटले की करमाळ्यातील अनेकांच्या डोळ्यांसमोर एक उत्साही, व्यक्तिमत्त्व उभे राहते. लहानपणापासूनच त्यांचा संगीताशी जवळचा संबंध होता. जुन्या काळातील ‘मेळ्यात’ ते क्रियाशील होते. हार्मोनियम असो, हलगी असो किंवा लेझीमच्या कसरती असो—प्रत्येक कलेत ते निष्णात होते. लेझीम शिकविण्यात तर त्यांचा हातखंडा होता. विद्यार्थ्यांना केवळ ताल-लय शिकवायची नाही, तर त्यांच्यामध्ये शिस्त आणि संघभावना निर्माण करायची, हे त्यांचे वैशिष्ट्य होते.


त्यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले होते. मात्र नोकरी नव्हती.पण त्याकाळात गुणवत्तेची कदर करणारे नेते होते. स्वातंत्र्यसैनिक व
माजी आमदार कै. नामदेवराव जगताप यांनी त्यांच्या अंगी असलेले गुण ओळखले आणि महात्मा गांधी विद्यालयात त्यांना सेवा करण्याची संधी दिली.
महात्मा गांधी विद्यालयाच्या सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांमध्ये ‘एल. यु.’ यांचे योगदान मोठे होते. गायन, वादन, लेझीम, हलगी अशा विविध कलांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना घडविले. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, शाळेचे गॅदरिंग आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम म्हटले की एल. यु. असणारच. तहसील कार्यालयासमोरच्या राष्ट्रगीताला एल.यु. ची बासरीच आघाडीवर असायची आता ही पोकळी भरून येणार नाही.
कला ही केवळ स्वतःपुरती मर्यादित न ठेवता ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची त्यांची धडपड शेवटपर्यंत कायम राहिली.
विशेष म्हणजे, निवृत्ती किंवा वय यापैकी कशानेही त्यांचा उत्साह कमी झाला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत ते विद्यार्थ्यांमध्ये दिसत होते. कोणतीही अपेक्षा न ठेवता, केवळ विद्यार्थ्यांना काहीतरी शिकवावे आणि आपल्या कलेचा वारसा पुढे जावा, या भावनेतून ते काम करीत राहिले.
अशा या गुणी कलावंताचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झालेले निधन ही करमाळ्याच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी मोठी हानी आहे. काही माणसे पदामुळे नाहीत, तर आपल्या कार्यामुळे मोठी होतात.अर्थात एल. यु. हे त्यापैकीच एक होते.
अशा एल. यु. यांना भावपूर्ण श्रध्दांजली..!
———————————
डाॅ.ॲड.बाबूराव हिरडे, करमाळा.मो.न. 9011355389
