विहाळ येथे ८२ वर्षाच्या आज्जीचा खून – नातीवर गुन्हा दाखल

करमाळा /संदेश प्रतिनिधी :
करमाळा,ता.१५: विहाळ येथे एका ८२वर्षाच्या आज्जीचा खून झाला आहे. या प्रकरणी नातीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार ११ एप्रिल च्या मध्यरात्री घडला आहे.घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात पोलीस हवालदार दिपक घोरपडे यांनी फिर्याद दिली आहे.त्यात त्यांनी म्हटले,की विहाळ येथे यात्रा बंदोबस्तासाठी पोलिस पथक कार्यरत असताना ११ एप्रिल रोजी रात्री उशिरा संबंधित घटनेची माहिती मिळाली. त्यानुसार, एका वृद्ध महिलेला तिची नात मारहाण करत असल्याची तक्रार डायल 112 वर प्राप्त झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.

त्या वेळी संबंधित वृद्ध महिला जिवंत असून, तिने उठबस करण्यात अडचण असल्याचे सांगितले. तसेच, नात त्रास देत असल्याची तक्रारही तिने केली होती. पोलिसांनी दोन्ही पक्षांना समज देऊन आवश्यक ती खबरदारी घेतली व पुढील वाद टाळण्याचे आवाहन केले. मात्र, दुसऱ्या दिवशी १२ एप्रिल रोजी सकाळी जनाबाई सुरवसे या आज्जीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, मृतदेहाजवळ रक्ताचे डाग आढळून आले. तसेच डोक्याच्या मागील बाजूस जखम असल्याचे निदर्शनास आले. घटनेनंतर मृतदेह पुढील तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, करमाळा येथे पाठवण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले. यानुसार या आज्जीच्या नातीने आज्जी सारखी कुरकुर करते म्हणून मारहाण करुन तीचे डोके दगडावर आपटून खून केल्याचे समजले. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल केला असून, संबंधित नातीला अटक केली आहे. पुढील चौकशी सुरु आहे. या घटनेमुळे विहाळ गावात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

