कुगाव–शिरसोडी पुलाला स्व. अजितदादा पवार यांचे नाव द्यावे – संभाजी ब्रिगेडकडून मुख्यमंत्रीमंत्र्यांना निवेदन

केम(संजय जाधव):करमाळा आणि इंदापूर तालुक्यांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या उजनी जलाशयावरील कुगाव (ता. करमाळा) ते शिरसोडी (ता. इंदापूर) या पुलाला स्व. अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नितीन खटके यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारामुळे या भागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या कुगाव–शिरसोडी पुल प्रकल्पास मंजुरी मिळाली. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागला असून सध्या पुलाचे काम सुरू आहे. या पुलामुळे करमाळा व इंदापूर तालुक्यांतील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सध्या या भागातील नागरिकांना भिगवण–टेंभुर्णी मार्गे सुमारे ९० ते १०० किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागतो. या लांबच्या प्रवासामुळे वेळ, इंधन आणि पैशाचा अपव्यय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना उजनी जलाशयातून होडीने प्रवास करण्याचा धोकादायक पर्याय स्वीकारावा लागत होता. या जलप्रवासादरम्यान आतापर्यंत ५० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर पुल प्रकल्पाला गती देण्यात अजित पवार यांच्या योगदानाची दखल घेऊन या पुलाचे नामकरण “स्व. अजितदादा पवार पूल” असे करण्यात यावे, अशी मागणी नितीन खटके यांनी केली आहे.
पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर करमाळा आणि इंदापूर तालुक्यांतील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ होईल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

