जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा करमाळा काँग्रेसकडून निषेध -

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा करमाळा काँग्रेसकडून निषेध

0

करमाळा | प्रतिनिधी : दिल्ली येथील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींवर झालेल्या कथित पोलिस लाठीमाराच्या निषेधार्थ करमाळा तालुका काँग्रेस (आय)च्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. तालुकाध्यक्ष प्रतापराव नामदेवराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.


यावेळी बोलताना प्रतापराव जगताप यांनी सांगितले की, NEET परीक्षेतील कथित पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे विद्यार्थी शांततापूर्ण व कायदेशीर मार्गाने आंदोलन करत असताना त्यांच्यावर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अत्यंत निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले.

त्यांनी पुढे आरोप केला की, आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले खासदार राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी तसेच सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिताताई शिंदे यांच्याशीही धक्काबुक्की करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची केंद्र सरकारने चुकीची हाताळणी केली असून आंदोलनाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करताना जगताप म्हणाले की, सरकार लोकशाही मूल्यांचा आदर करत नसून विद्यार्थी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांवरील कारवाई निषेधार्ह आहे. या घटनेमुळे देशभरात जनतेमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून हा रोष आता जनआंदोलनाचे रूप घेत आहे, असेही त्यांनी सांगितले.


येत्या दोन दिवसांत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला गेला नाही, तर करमाळा तालुका काँग्रेस (आय)च्या वतीने मोठ्या प्रमाणावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही प्रतापराव जगताप यांनी दिला.

यावेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव वाघमारे, अण्णा साळवे, अभिमान लष्कर, प्रतीक जगताप, किरण साळुंखे, बबलू चिंचकर, अशोक घरबुडे, नितीन चोपडे, गफूर शेख, सोमनाथ राखुंडे, योगेश राखुंडे, परवेजभाई पठाण, देवराव सुकळे, गणेश फलफले, सचिन कटारिया, मंगेश चिंचकर, अन्वर शेख, मुनीर शेख, असिफ बागवान, शिवाजी आवटे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!