पिस्टल व तलवारीचा धाक दाखवून खंडणी मागणारे दोघे जेरबंद – करमाळा पोलिसांची कारवाई

करमाळा(दि.५): करमाळा तालुक्यातील शेटफळ व वांगी क्र.१ या ठिकाणी पिस्टल व तलवारीच्या धाकावर खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या कारवाईत एक पिस्टल, एक रिकामी पुंगळी, एक तलवार आणि स्कॉर्पिओ कार जप्त केली आहे.

दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ११.१५ वाजता आणि २९ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता शेटफळ गावाजवळ व माने वस्ती (वांगी नं. १) येथे ही घटना घडली. आरोपी १) जयर्वधन उर्फ मुन्ना हनुमंत दैन (वय २५, रा. वांगी नं. १, करमाळा) २) प्रदीप मुकंद पोळ (वय २१, रा. शेटफळ, करमाळा) यांनी फिर्यादी अभयसिंह बाळासाहेब देशमुख यांना त्यांच्या नातेवाईकांसमवेत वाटेत अडवून, पिस्टल दाखवून शिवीगाळ करत खंडणी मागितली. आरोपी मुन्ना दैन याने देशमुख यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली आणि जीव घेण्याच्या उद्देशाने दोन राउंड फायरिंग केले. तसेच, दुसऱ्या दिवशी फिर्यादीच्या चालकाला मारहाण करून जखमी केले.

फिर्यादीच्या तक्रारीवरून करमाळा पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम ३०८, ११५, ३५२, तसेच शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी आरोपींना अटक करून बार्शी न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली पिस्टल, तलवार आणि स्कॉर्पिओ कार जप्त करण्यात आली आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी साो. सोलापूर ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक साो. श्री. प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील साो., करमाळा उपविभाग, करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.नि. रणजीत माने, स. पो. नि. पोपट टिळेकर, पो.उप निरीक्षक सुशीलकुमार पाखरे, पो.हवा. अजित उबाळे, पो.ना. मनिष पवार, पो.ना. वैभव टेंगल, पो.शि. तौफिक काझी, पो.शि. ज्ञानेश्वर घोगडे, पो.शि. सोमनाथ जगताप, पो.शि. अर्जुन गोसावी, पो.शि. गणेश शिंदे, पो.शि. योगेश येवले, पो.शि. रविराज गटकुळ, पो.शि. अमोल रंदील यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि. पोपट टिळेकर हे करीत आहे.



