करमाळा पोलिसांची धडक कारवाई- दहा लाखाचा मुद्देमाल जप्त - Saptahik Sandesh

करमाळा पोलिसांची धडक कारवाई- दहा लाखाचा मुद्देमाल जप्त


करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२०: करमाळा पोलिसांनी शहर व परिसरातील चोरीच्या घटनांचा तपास करत दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांचा छडा लावला असून, सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिलेसह दुचाकी चोरी करणाऱ्या एका संशयित आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण सुमारे १० लाख ७४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

करमाळा येथील बसस्थानक परिसरातून प्रवास करणाऱ्या फिर्यादीच्या हँडपर्समधून सुमारे १० लाख ९ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण तसेच बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध घेतला. तपासामध्ये साधना जैन्ना काळे (वय २७, रा. बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) हिचा सहभाग निष्पन्न झाला. पोलिसांनी तिची चौकशी केली असता चोरीचे दागिने तिने घरातील पेटीत लपवून ठेवल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तिच्या ताब्यातून २५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा राणी हार, २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मोठे घंटन, १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा चोकर तसेच ०५ ग्रॅम वजनाचे कानातील झुबे टॉप असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी साधना काळे हिला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार मोहोळकर करीत आहेत.


दरम्यान, करमाळा शहरातून चोरीला गेलेल्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकलचाही पोलिसांनी छडा लावला आहे. सुमारे ६५ हजार रुपये किंमतीची सदर मोटारसायकल करमाळा शहरातून चोरीला गेली होती. या प्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता रावसाहेब उर्फ पप्पू पांडुरंग चव्हाण (रा. सावडी, ता. करमाळा) याचा सहभाग निष्पन्न झाला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता चोरीची मोटारसायकल सावडी गावातील पुलाजवळ लपवून ठेवल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सदर मोटारसायकल जप्त करून रावसाहेब उर्फ पप्पू चव्हाण याला अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कवडे व उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.

error: Content is protected !!