करमाळ्याचा शैक्षणिक अनुशेष लवकरच भरून काढणार – प्रा. रामदास झोळ

करमाळा (प्रतिनिधी) : करमाळा तालुक्यात शालेय शिक्षणानंतर व्यावसायिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागत आहे. हा शैक्षणिक अनुशेष भरून काढण्यासाठी देवळाली येथे सर्व प्रकारच्या व्यावसायिक व शालेय अभ्यासक्रमांचे एकत्रित शैक्षणिक संकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी दिली.

प्रा. रामदास झोळ यांचा वाढदिवस शनिवार, दि. ११ एप्रिल रोजी करमाळा येथील प्रा. रामदास झोळ फाउंडेशन संपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
करमाळा तालुक्यात इंजिनिअरिंग, फार्मसी, बीबीए, बीसीए, एमबीए, एमसीए यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये नसल्यामुळे विद्यार्थ्यांना इतर शहरांचा पर्याय निवडावा लागतो. ही उणीव लक्षात घेऊन देवळाली येथे ‘दत्तकला शैक्षणिक संकुल’ उभारण्यात येणार असून, त्यामध्ये विविध व्यावसायिक तसेच शालेय अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना तालुक्यातच उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होईल, असे प्रा. झोळ यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, केतुर येथे डी. फार्मसी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून अनेक विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. करमाळा तालुक्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. भविष्यात देवळाली येथे ‘दत्तकला विद्यापीठ’ स्थापन करण्याचा मानस आहे. तसेच संस्थेत सध्या २५ ते ३० शिक्षक पदे रिक्त असून स्थानिक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी प्रा. रामदास झोळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपीनाथ पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर शिंदे यांनी मानले.


