विधवा प्रथा समाप्तीसाठी केंद्र सरकारने देशभर विशेष ग्रामसभा घेण्याचे निर्देश द्यावेत; पंतप्रधानांकडे मागणी

0

करमाळा (दि.३१): महात्मा फुले समाज सेवा मंडळ  यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून 23 जून ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिना’च्या निमित्ताने देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करून ‘विधवा प्रथा समाप्त’ करण्याचा ठराव मंजूर करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर अभियान राबविण्याची मागणी केली आहे.

संस्थेने पाठविलेल्या निवेदनात विधवा महिलांवर होत असलेल्या सामाजिक अन्याय, अपमानास्पद प्रथा व मानवी हक्कांच्या उल्लंघनाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. पतीच्या निधनानंतर महिलांना कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे, शुभ कार्यांपासून दूर ठेवणे अशा प्रथा अजूनही काही भागात सुरू असून, त्या महिलांच्या सन्मान व समानतेच्या अधिकाराला बाधा आणणाऱ्या असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.



निवेदनात महाराष्ट्रातील हेरवाड गावाचा संदर्भ देत, तेथे ग्रामसभेत ठराव मंजूर करून विधवा प्रथा समाप्त करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरत असून महाराष्ट्र सरकारनेही त्याची दखल घेत विविध ग्रामपंचायतींना अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याबाबत निर्देश दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी केंद्र सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या असून, 23 जून रोजी देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा घेऊन ‘विधवा प्रथा समाप्त’ करण्याचा ठराव मंजूर करावा, यासाठी सर्व राज्यांना निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या उपक्रमाला राष्ट्रीय अभियानाचे स्वरूप देऊन महिला सन्मान, समानता आणि सामाजिक न्याय यासाठी व्यापक जनजागृती करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

प्रमोद झिंजाडे



याशिवाय विधवा महिलांवर होणाऱ्या अमानवीय प्रथांविरोधात कठोर कायदेशीर संरक्षण देण्याची आणि भारताच्या या उपक्रमाची संयुक्त राष्ट्र संघात मांडणी करण्याची मागणीही संस्थेने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!