कपाटाचे दार उघडून सोन्याचे दागिने लंपास-वीट येथे चोरी

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा: वीट (ता. करमाळा) येथे घराच्या शेजारील पत्र्याच्या खोलीत ठेवलेल्या कपाटाचे दार उघडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दि. १५ सप्टेंबर च्या मध्यरात्री घडली.
याप्रकरणी अमोल हनुमंत ढेरे (रा. वीट) यांनी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, घरात पाहुणे येणार असल्याने त्यांनी घरातील कपाट शेजारील पत्र्याच्या खोलीत नेऊन ठेवले होते. या खोलीला कडी लावलेली नव्हती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पत्र्याच्या खोलीत प्रवेश करून कपाटाचे दार उघडले.
कपाटामध्ये फिर्यादीच्या आईचे सोन्याचे दागिने ठेवले होते. त्यामध्ये १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, १० ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ तसेच २ हजार रुपये रोख, असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
या प्रकरणी करमाळा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


