उजनी जलाशयातून अवैध वाळू उपसा — कंदरमध्ये टेम्पोसह दोन जणांवर कारवाई

करमाळा(दि.१३):कंदर (ता. करमाळा) येथे उजनी जलाशयाच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्यांवर महसूल व पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करत टेम्पोसह वाळू जप्त केली आहे.

गोरक्षनाथ यशवंत ढोकणे (वय ४०, ग्राम महसूल अधिकारी – तलाठी, कंदर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारास करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दूरध्वनीवरून माहिती दिली की, कंदर परिसरात काही जण उजनी जलाशयातून अवैध वाळू उपसा करत आहेत. त्यानुसार महसूल अधिकारी ढोकणे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोकाँ निकम, पोहेकाँ लोकरे, पोकाँ गुटाळ, महसूल सेवक नागेश पवार आणि दोन पंच यांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी छापा टाकला.

भांगे वस्तीकडून कंदरकडे येत असलेला एमएच २४ जे ७४७७ क्रमांकाचा टाटा ४०७ टेम्पो थांबवून तपासला असता, त्यात अंदाजे सव्वा ब्रास वाळू (किंमत रु. २,१०,०००) भरलेली आढळली. चालकाने आपले नाव नितीन हनमंत कदम (वय ४६, रा. कंदर, ता. करमाळा) असे सांगितले. चौकशीत त्याने सांगितले की, टेम्पो हा सुनिल उर्फ भाऊ दिलीप माने (रा. कंदर) यांचा असून, त्यांच्या सांगण्यावरून उजनी जलाशयातून (कव्हे-रोपळे पाणी पुरवठा विहिरी जवळुन) भरल्याचे वाळू भरल्याचे कबूल केले. मात्र त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना किंवा रॉयल्टी नसल्याचे निष्पन्न झाले.

सदर टेम्पो व वाळू पंचासमक्ष जप्त करून चालक नितीन कदम यासह पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी करमाळा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे करत आहेत.



