वर्षानुवर्षे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्ग बदलण्याचे संकेत

केम (संजय जाधव): आषाढी वारीनंतर परतीच्या मार्गावर असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज व श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखींचे केम येथे भाविकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी, जेसीबीच्या साहाय्याने करण्यात आलेली पुष्पवृष्टी आणि हरिनामाच्या जयघोषाने संपूर्ण केम नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली.
मात्र दहिवली–ऊपळवाटे–केम या पालखी मार्गाच्या अत्यंत दुरवस्थेमुळे श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या चांदीच्या रथाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करत पुढील वर्षापासून हा मार्ग बदलण्याचा इशारा दिंडी प्रमुख ह.भ.प. राहुल साळुंखे यांनी दिला.

शुक्रवार, ३१ जुलै रोजी सकाळी १० वाजता श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे, तर सायंकाळी ५ वाजता श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे केममध्ये आगमन झाले. पारखे वस्ती येथे केम ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने फटाक्यांच्या आतषबाजीसह पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यानंतर पालखी श्रीराम मंदिराच्या मुक्कामस्थानी पोहोचली. शिवाजी चौकात जेसीबीच्या साहाय्याने पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मंदिरात आगमनानंतर श्रींची आरती झाली. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.


सायंकाळी कीर्तन झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. तसेच केम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वारकऱ्यांना औषधे व गोळ्यांचे वाटप करण्यात आले. हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी नित्यनेमाप्रमाणे पूजा झाल्यानंतर संजय देवकर, बाबा मोरे, अरुण ससाणे आणि नाना देवकर यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. सकाळी साडेसात वाजता ग्रामस्थांचा निरोप घेऊन पालखी निंभोरेकडे प्रस्थान केली.
मात्र दहिवली–ऊपळवाटे–केम या पालखी मार्गाची झालेली दुरवस्था वारकऱ्यांसाठी मोठी अडचण ठरली. खड्डेमय रस्त्यामुळे वारकऱ्यांना चालताना त्रास सहन करावा लागला, बैलांचेही खड्डेमय रस्त्याने चालताना हाल झाले. याच खराब रस्त्यामुळे श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या चांदीच्या रथाच्या टोपासह रथाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे पुढील वर्षापासून हा मार्ग बदलण्याचा इशारा दिंडी प्रमुख ह.भ.प. राहुल साळुंखे यांनी दिला.



