शेतातील बांधाला लावलेल्या आगीतून शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान

करमाळा /संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१ : शेजारील शेतकऱ्याने गवताचा बांध पेटविल्याने लागलेल्या आगीत दुसऱ्या शेतकऱ्याचे सुमारे 1.50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शेलगाव (क) परिसरात घडली आहे. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत राजु उर्फ राजेश जोतिराम जाधव (वय 60, रा. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीची शेती गट नं. 307 मध्ये असून तेथे शेतीसाठी दोन खोल्या व साहित्य ठेवलेले आहे.
दि. 26 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 3 वाजता, शेजारील शेतकरी बाळसाहेब तुकाराम मोहिते (रा. शेलगाव (क) यांनी आपल्या शेतातील गवताचा बांध पेटविला. ही आग पसरून जाधव यांच्या शेतात गेली. आगीने मोठा भडका घेतल्याने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.

या आगीत जाधव यांच्या शेतातील पीव्हीसी पाइप, इलेक्ट्रिक पाणबुडी मोटार, केबल, खतांची पोती, स्प्रिंकलर सेट, ड्रिप पाईप तसेच शेडमधील दरवाजे व खिडक्या असे शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेत अंदाजे 1.50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी संबंधित शेतकरी बाळसाहेब मोहिते यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत.



