सावडी येथे सलग चौथ्या वर्षी सचिन देशमुख यांचेमार्फत मोफत पाणीपुरवठा

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.५: भीषण उन्हाळा, वाढती पाणीटंचाई आणि पाण्यासाठी महिलांची होणारी परवड… अशा कठीण परिस्थितीत सावडी गावासाठी गावचे सुपुत्र व पुणे येथील व्यावसायिक सचिन भगवानराव देशमुख हे अधुनिक भगिरथ ठरले आहेत. श्री.देशमुख हे सलग चार वर्षापासून सावडी ग्रामस्थांना मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहेत. वडील स्व.भगवानराव गोविंदराव देशमुख यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ सुरू केलेल्या या उपक्रमांतर्गत दर महिन्याला सुमारे सात ते साडेसात लाख लिटर पाणी सावडी ग्रामस्थांना पूर्णतः मोफत उपलब्ध करून देतात. त्यामुळे उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या तीव्र पाणीटंचाईवर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत आहे.

विशेष म्हणजे, गावातील महिलांसाठी हा उपक्रम जणू वरदानच ठरत आहे. अन्यथा उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण, हंडाभर पाण्यासाठी होणारी धावपळ आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. मात्र सचिन देशमुख यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सावडीकरांना विशेषतः महिलांना पाणीटंचाईची झळ बसत नाही. गावाच्या मातीतले ऋण जपत, कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून राबविण्यात येणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. “पाणी म्हणजे जीवन” ही उक्ती प्रत्यक्षात उतरवत सचिन देशमुख यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे.
यामुळे सावडी गावातील महिलांनी तसेच ग्रामस्थांनी सचिन देशमुख यांचे विशेष कौतुक केले आहे.

