वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर देशमुख यांचे जेऊर येथे आमरण उपोषण सुरू -

वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर देशमुख यांचे जेऊर येथे आमरण उपोषण सुरू

0

करमाळा (दि.८): करमाळा तालुक्यातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या प्रश्नाकडे महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वांगी (ता. करमाळा) येथील शेतकरी उदयसिंह निळकंठ देशमुख यांनी ७ जूनपासून जेऊर येथील महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. यापूर्वी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देऊनही मागण्यांवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.

देशमुख यांनी दिलेल्या निवेदनात करमाळा तालुक्यातील कृषी वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याची तक्रार केली आहे. सध्या तालुक्यात पाणीसाठा उपलब्ध असतानाही केवळ चार तास वीजपुरवठा होत असल्याने केळी, ऊस व इतर पिकांना पुरेसे पाणी देता येत नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे शेतीसाठी सलग आठ तास वीज पुरवठा करावा अशी मागणी ते या उपोषणाद्वारे करत आहेत.



सिंगल फेज पुरवठ्यात देखील अडचणी
ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांमध्ये वापरात असलेली सिंगल फेज  वीजपुरवठा रात्री अपरात्री वारंवार खंडित होत असल्याने जनजीवन विस्कळीत होत आहे.  सिंगल फेज लाईनमधील तांत्रिक त्रुटी दूर करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी प्रमुख मागणी देशमुख यांनी केली होती.

दरम्यान वीज वितरण अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन सिंगल फेज वीज पूर्ण तालुक्यामध्ये देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
सिंगल फेजची मागणी मान्य झाली असली तरी शेतीसाठी आठ तासाच्या वीजेची मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार देशमुख यांनी व्यक्त केला आहे. या उपोषणामुळे करमाळा तालुक्यातील कृषी वीजपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून महावितरण प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

बच्चू कडू यांचा वीज अधिकाऱ्यांना फोन

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील या आंदोलनाची दखल घेत वीजवितरण अधिकाऱ्यांना फोन करून उपोषणाच्या मागण्या मान्य करून सुरळीत वीज पुरवठा करण्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!