
केम(संजय जाधव): केम मंडळ येथे कार्यरत असलेल्या मंडळ अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी व नाराजी व्यक्त होत असल्याने संबंधित मंडळ अधिकाऱ्यांची तातडीने बदली करून त्यांच्या जागी नवीन मंडळ अधिकारी नियुक्त करावा, असा ठराव केम ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. याच मागणीसाठी प्रहार संघटनेचे करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी करमाळ्याचे तहसीलदार यांनाही निवेदन दिले आहे.

केम ग्रामपंचायतीची ग्रामसभा दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. यावेळी विषय क्रमांक ११ अंतर्गत मंडळ अधिकारी केम यांच्या बदलीबाबत चर्चा करण्यात आली. केम मंडळाअंतर्गत एकूण आठ गावे येत असून, महसूल विभागाशी संबंधित विविध कामांसाठी नागरिकांना मंडळ अधिकाऱ्यांशी नियमित संपर्क साधावा लागतो.
मात्र, संबंधित मंडळ अधिकारी कार्यालयात नियमित उपलब्ध नसल्याने नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रार ग्रामसभेत करण्यात आली. तसेच फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास फोन बंद लागत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे. फेरफार नोंदी, वारस नोंदी, जमिनीशी संबंधित कामे, पंचनामे व इतर महसूल विषयक कामांमध्ये विलंब होत असल्याने नागरिकांचा वेळ, पैसा व श्रम वाया जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. ग्रामसभेतील ठरावाचे सूचक संदीप साहेबराव तळेकर, तर अनुमोदक सागर रामचंद्र कुरडे होते. ग्रामसभेने ठरावास सर्वानुमते मंजुरी दिली.

दरम्यान, संदीप तळेकर यांनी तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनातून संबंधित मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन उपस्थितीची, प्रलंबित कामांची व प्राप्त तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रशासकीय कारणास्तव संबंधित मंडळ अधिकाऱ्यांची नियमानुसार तातडीने बदली करून केम मंडळासाठी नवीन व नियमितपणे कार्यालयीन कामकाज पाहणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, तसेच आठही गावांतील प्रलंबित महसूल कामे तातडीने निकाली काढण्यासाठी विशेष कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मंडळ अधिकारी नागटिळक यांची प्रतिक्रिया दिली
मंडळ अधिकारी नागटिळक यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, करमाळा व माढा या दोन्ही तालुक्यांमध्ये मंडल अधिकारी म्हणून कार्यरत असलेली मी एकमेव महिला आहे. अतिक्रमण हटविणे व रस्ते खुले करण्याचे काम करमाळा तालुक्यात सर्वात जास्त केम मंडळाने केले आहे. असे असून देखील महिला अधिकारी असल्यामुळे काही लोक जाणूनबुजून मला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकीय हेतूने माझ्या बदलीची मागणी करत आहे.
नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा एकाच ठिकाणी मिळाव्यात, या उद्देशाने केम येथे काही दिवसांपूर्वी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. त्या कॅम्पबाबतही माझ्या कामावर टीका करण्यात आली.
पुढे त्या म्हणाल्या की, रस्ते खुले करण्याचे काम संवेदनशील असून, नागरिकांच्या हितासाठी नियमांनुसार व दबावमुक्त पद्धतीने मी काम करण्याचा प्रयत्न करत असते. दि. १२ जून रोजी गट नं. ३५५ मधील रस्ता खुला करण्यासाठी मी स्वतः कडाक्याच्या उन्हात अनेक वेळा पाहणी केली. वादी-प्रतिवादी यांच्यातील वाद थांबवून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. त्यामुळे घटनास्थळी कोणताही वाद वाढू नये, यासाठी मी संयमाने काम केले. मात्र, त्यानंतरही माझ्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.”
“वडशिवणे रस्ता प्रकरणातही संबंधितांकडे स्थगिती आदेश नसल्याने रस्ता खुला करण्याची कार्यवाही करणे आवश्यक होते. त्यामुळे या कामाची वस्तुस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा आहे.
कंदर येथील कॅम्पमध्ये केमच्या कॅम्पबाबत तलाठ्यांनी नकारात्मक उल्लेख केल्याने तेथे उपस्थित केमच्या नागरिकांना वाईट वाटले. या प्रकाराबद्दल तलाठी यांच्या वतीने मी संबंधित नागरिकांची माफी देखील मागितली होती. केम ग्रामस्थांना माझी बदली व्हावी वाटत असेल तर त्यासाठी मी या बदलीसाठी तयार आहे.

