
केम (संजय जाधव): केम गावातील युवकांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या ‘आपले केम स्वच्छ केम’ ग्रामस्वच्छता अभियानाला दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. युवकांच्या या उपक्रमाचे करमाळा व दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसह मान्यवरांनी कौतुक केले.
या स्वच्छता अभियानात करमाळा तालुक्याचे गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज राऊत तसेच छत्रपती शासन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्राणजीत गवंडी यांनी उपस्थित राहून युवकांसोबत प्रत्यक्ष श्रमदान केले.

डॉ. अमित कदम यांनी युवकांनी स्वतः पुढाकार घेऊन सुरू केलेल्या स्वच्छता उपक्रमाचे कौतुक करत, ही संकल्पना केवळ केम गावापुरती मर्यादित न राहता संपूर्ण करमाळा तालुक्यात राबविण्याची गरज असल्याचे सांगितले. अभियानासाठी प्रशासकीय पातळीवर कोणत्याही सहकार्याची आवश्यकता असल्यास कळवावे, आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनीही या उपक्रमाचे कौतुक करून, केमच्या युवकांनी सुरू केलेली स्वच्छतेची चळवळ पुढील आठ दिवसांत दक्षिण सोलापूर तालुक्यात सुरू करण्याचा संकल्प व्यक्त केला.
छत्रपती शासन ग्रुपचे सहकारी टीमचे उपाध्यक्ष दादासाहेब तनपुरे यांनीही श्रमदानात सहभाग घेत युवकांचे कौतुक केले. प्रत्येक युवकाने स्वच्छतेच्या कार्यात सहभागी होण्याची गरज असून, ही चळवळ गावापुरती मर्यादित न राहता तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. गड-किल्ले स्वच्छता मोहिमांच्या माध्यमातूनही स्वच्छतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

या अभियानाला ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी वैभव तळेकर यांचे सातत्याने सहकार्य मिळत आहे. स्वच्छता मोहिमेसाठी आवश्यक प्रशासकीय सहकार्य करण्याबरोबरच दर रविवारी दोन तास गावासाठी श्रमदान करण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली.
केम गावातील युवक दर रविवारी श्रमदान करून गावाच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वतः स्वीकारत आहेत. ‘स्वच्छतेसाठी प्रशासनासोबत नागरिकांचा सहभाग’ हा संदेश या अभियानातून दिला जात असून, युवकांच्या वाढत्या सहभागामुळे या उपक्रमाला चळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे.

केममधून सुरू झालेली ही स्वच्छतेची चळवळ करमाळा तालुका, सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विविध भागांत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. ‘आपले केम स्वच्छ केम’ अभियान हे स्वच्छ, सुंदर आणि आदर्श गावाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.


