करमाळा व केम येथे कर्करोग निदान शिबिराचे आयोजन

करमाळा(दि.८) : करमाळा तालुक्यात २ ठिकाणी ९ व १० मे रोजी मोफत कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ९ मे रोजी व करमाळा उपजिल्हा रुग्णालयात १० मे रोजी सकाळी १० वाजता हे शिबिर होणार आहे. सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन गुंजकर यांनी केले आहे.

या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार नारायण पाटील, पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी नवले आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांच्या उपस्थिती राहणार आहे. त्यांच्या सहकार्याने करमाळा व केम येथे कर्करोग तपासणीसाठी विशेष व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

डॉ. गुंजकर यांनी सांगितले की, आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यासह कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. मात्र, वेळेवर निदान व उपचार घेतल्यास कर्करोग बरा होऊ शकतो. मुख, स्तन व गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी या शिबिरात करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. गुंजकर व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. काटकर यांनी केले आहे.




