शिवसेनेतर्फे प्रत्येक तालुक्यात डायलिसिस सेंटर व ब्लड बँक उभारण्याचा संकल्प – गृहराज्यमंत्री योगेश कदम

0

करमाळा(दि.८): उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात डायलिसिस सेंटर आणि ब्लड बँक स्थापन करण्याचा शिवसेनेचा संकल्प आहे. “सर्वसामान्य रुग्णांची सेवा करण्याची खरी ताकद शिवसेनेकडेच आहे,” असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी करमाळा येथे केले.

करमाळा येथे  डॉक्टर श्रीकांत शिंदे डायलिसिस सेंटर, मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे ब्लड बँक आणि मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे नर्सिंग कॉलेजला भेट देऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी आमदार गोपीचंद पडळकर, माजी तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, वैद्यकीय कक्ष प्रमुख नागेश शेंडगे पाटील, नर्सिंग कॉलेजचे चेअरमन दीपक राव पाटणे, शिवसेना शहरप्रमुख संजय शीलवंत आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी स्वागत उपमुख्यमंत्री शिंदे यांचे सहाय्यक मंगेश चिवटे यांनी केले. आपल्या भाषणात योगेश कदम म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे संवेदनशील आणि लोकहितैषी नेतृत्व आहे. महाराष्ट्रातील कोणताही रुग्ण उपचाराविना राहणार नाही, यासाठी शिवसेना आणि तिचे कार्यकर्ते अहोरात्र कार्यरत आहेत. आरोग्याच्या गरजांच्या वेळी लोकांना प्रथम शिवसेनेची आठवण येते, हेच आमच्या कार्याचे यश आहे.”

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनीही महत्वपूर्ण घोषणा करत सांगितले की, करमाळा शहरात लवकरच अत्याधुनिक कॅशलेस हॉस्पिटल उभारले जाणार आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून हे स्वप्न लवकरच साकार होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुलेखन– प्रशांत खोलासे, केडगाव(ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!