ह्यूमन राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या राज्य उपाध्यक्षपदी माधुरी माने यांची नियुक्ती

करमाळा (प्रतिनिधी): मानवाधिकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या ह्यूमन राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी करमाळा येथील माधुरी नामदेवराव माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवदास नारायण महाजन यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र प्रदान करण्यात आले.

माधुरी माने या सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून मानवाधिकार संरक्षण, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय तसेच विविध सामाजिक प्रश्नांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने योगदान देत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत संस्थेच्या कार्यकारी समितीने त्यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे.
या नियुक्तीमुळे महाराष्ट्रभर मानवाधिकारांविषयी जागरूकता निर्माण करणे, नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणे तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणी करणे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
नियुक्तीनंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी माधुरी माने यांचे अभिनंदन करत त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. राज्यभरातील मानवाधिकार चळवळीला त्यांच्या नेतृत्वाचा लाभ होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
माधुरी माने या करमाळा शहरातील राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेले दिवंगत नामदेव माने गुरुजी यांच्या कन्या आहेत. त्यांच्या या निवडीमुळे करमाळा तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, वैद्यकीय, विधी, कला आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

