कै.डॉ.प्रदीपकुमार जाधव-पाटील यांच्या जयंतीनिमित्त करमाळ्यात आरोग्य शिबिर संपन्न

करमाळा (प्रतिनिधी) : आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने व कै. डॉ. प्रदीपकुमार (आबा) जाधव-पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित बहुदिवसीय आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले. ३ एप्रिल ते १७ एप्रिल २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या शिबिरास शहर व तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिरामध्ये सर्वसामान्य तपासणीसह मूळव्याध, किडनी विकार, मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथी विकार, फुफ्फुसांचे आजार (टीबी, दमा), हाडांचे विकार, मेंदूविकार, त्वचारोग, केसांच्या समस्या, दंतचिकित्सा, हृदयरोग तसेच बालहृदयरोग अशा विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून सखोल तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. अनेक तपासण्या व उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला.

शिबिराचे वेळापत्रक सकाळी ९ ते दुपारी ३ तसेच काही दिवस दुपारी २ ते सायंकाळी ५ असे ठेवण्यात आले होते. नामांकित व अनुभवी डॉक्टरांच्या उपस्थितीमुळे नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळाली. दंत तपासणी, रूट कॅनॉल व दातांच्या कव्हरवर देण्यात आलेल्या विशेष सवलतीलाही चांगला प्रतिसाद लाभला.
१७ एप्रिल रोजी आयोजित रक्तदान शिबिरात ६६ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. तहसीलदार शिल्पा ठोकडे व पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
उपलब्ध आकडेवारीनुसार मूळव्याध शिबिरात ८७, किडनी व मुतखडा विकार ५४, फुफ्फुसांचे आजार २३, हाडांचे आजार ३५, बालहृदयरोग २, हृदयरोग २९, केस व त्वचारोग ५८, दंत कव्हर व रूट कॅनॉल २४, मेंदूविकार २७, हृदय तपासणी २५ तर रक्तदान शिबिरात ६६ नागरिकांनी लाभ घेतला.
सर्व शिबिरे जाधव-पाटील हॉस्पिटल, अर्बन बँक शेजारी, मेन रोड, करमाळा येथे पार पडली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सचिव अभिजित पाटील, डॉ. शिवानी पाटील, अजिंक्य पाटील, तात्यासाहेब जाधव, महादेव भोसले, प्रमोद जगदाळे, राहुल जाधव व शीतल पेटकर यांनी विशेष सहकार्य केले.

डॉ. रोहन पाटील यांनी सांगितले की, संस्थेमार्फत भविष्यातही सामाजिक, आरोग्यविषयक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार असून त्याचा लाभ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात घराजवळ आरोग्यसेवा उपलब्ध होण्याचा सकारात्मक आदर्श निर्माण झाला आहे.

