करमाळा बाजार समितीत स्वनिधीतून रस्ते काँक्रिटीकरण सुरू

0

करमाळा (दि.१०): करमाळा बाजार समितीच्या पूर्व यार्डमध्ये रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. यावेळी श्री.जगताप म्हणाले की, बाजार समितीने हे काम बँका किंवा कृषी पणन मंडळाकडून कर्ज न घेता स्वनिधीतून सुरू केले असून शेतकऱ्यांना आगामी काळात अधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समिती कटिबद्ध आहे.

कार्यक्रमास सहाय्यक निबंधक अनिकेत शिंदे प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार जगताप यांनी करमाळा बाजार समितीच्या स्थापनेचा इतिहास सांगताना नमूद केले की, शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी कै. नामदेवराव आणि कै. अण्णासाहेब जगताप यांनी समितीची स्थापना केली होती. “१९८९ मध्ये मी बाजार समितीची धुरा स्वीकारली, तेव्हा वार्षिक उत्पन्न केवळ १८ लाख रुपये होते. उत्पन्नवाढीसाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स व गोदामांची उभारणी केली आणि आज उत्पन्न ३ कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे,” असे त्यांनी सांगितले.

“यामुळे आम्ही कोणत्याही वित्तीय संस्थेचे कर्ज न घेता स्वनिधीतूनच मूलभूत सुविधा निर्माण करत आहोत,” असेही जगताप म्हणाले. बाजार समितीतील विश्वसनीयतेमुळे आज शेतमाल विक्रीसाठी करमाळ्यासह आसपासच्या तालुक्यांमधूनही मोठ्या प्रमाणावर माल येतो. आगामी काळात उर्वरित रस्त्यांचे काँक्रिटीकरण व जनावरांचा बाजार सुरू करण्याच्या योजना आहेत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कार्यक्रमात बबनराव मेहेर, श्रेणिकशेठ खाटेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत, संचालक जनार्धन नलवडे, सागर दौंड, तात्यासाहेब शिंदे, नागनाथ लकडे, महादेव कामटे आदी मान्यवरांसह व्यापारी, हमाल-तोलार, गाळेधारक, जिल्हा बँक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक युसुफ शेख यांनी केले. उपस्थितांचे स्वागत संतोष गुगळे व सचिव विठ्ठल क्षिरसागर यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्तात्रय शिर्के यांनी मानले.

सुलेखन– प्रशांत खोलासे, केडगाव(ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!