बिटरगाव (श्री) मध्ये दुर्दैवी अपघात : विद्युत पंप काढताना महिलेचा मृत्यू

करमाळा(दि.१०) : बिटरगाव श्री (ता. करमाळा) येथील मनीषा नितीन मुरूमकर (वय ३४) यांचा शेतातील अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी (५ मे) सायंकाळी बोअरवेलमधील विद्युत पंप बाहेर काढत असताना दावं तुटून लाकूड डोक्याला लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान बुधवारी (७ मे) खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

मनीषा मुरूमकर या पती नितीन मुरूमकर व लहान मुलासह सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शेतात गेल्या होत्या. पंप ओढण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टरला जोडलेला दावं अचानक तुटला आणि त्यातील लाकडी भाग त्यांच्या डोक्याला जोरात लागला. अपघातावेळी त्यांचा लहान मुलगा शेजारी उभा होता तर मोठा मुलगा काळा पाईप ओढत होता.
अपघातानंतर माजी सरपंच शिवाजी मुरूमकर, वैभव मुरूमकर, मधुकर शिर्के व इतरांनी त्यांना तातडीने करमाळ्याच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

मनीषा मुरूमकर यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सासू-सासरे असा परिवार आहे. त्या बिटरगाव श्री विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष लालासाहेब मुरूमकर यांची सून आणि पत्रकार अशोक मुरूमकर यांच्या चुलत भावजयी होत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्या मनमिळावू स्वभावाच्या म्हणून परिचित होत्या.

त्यांच्यावर बिटरगाव श्री येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून दशक्रिया विधी शुक्रवार (१६ मे) रोजी संगोबा येथे होणार आहे.



