कारगिल विजय दिनानिमित्त गायक प्रवीणकुमार अवचर व पत्रकार शितलकुमार मोटे यांचा विशेष सन्मान -

कारगिल विजय दिनानिमित्त गायक प्रवीणकुमार अवचर व पत्रकार शितलकुमार मोटे यांचा विशेष सन्मान

0

करमाळा (प्रतिनिधी) : कारगिल विजय दिनानिमित्त करमाळा येथे यश कल्याणी सेवाभावी संस्था व आजी-माजी सैनिक…

करमाळा (प्रतिनिधी) : कारगिल विजय दिनानिमित्त करमाळा येथे यश कल्याणी सेवाभावी संस्था व आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्यात प्रसिद्ध गायक प्रवीणकुमार अवचर आणि टीव्ही 9 चे प्रतिनिधी शितलकुमार मोटे यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

गेल्या पाच वर्षांपासून कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने यश कल्याणी सेवाभावी संस्थेच्या सभागृहात आजी-माजी सैनिक, सैनिकांच्या कुटुंबीयांसह कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येतो. यंदा २७ व्या कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमात ज्येष्ठ कवी व साहित्यिक प्रा. डॉ. सुरेश शिंदे यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन निर्भीड वृत्तांकन करणारे टीव्ही 9 चे प्रतिनिधी शितलकुमार मोटे यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याचप्रमाणे करमाळा तालुक्यातील मांगी गावचे सुपुत्र आणि पुणे येथील ‘म्युझिक कलर्स ऑर्केस्ट्रा’चे संचालक प्रवीणकुमार अवचर यांना गेल्या ३३ वर्षांपासून गायन व कला क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ करे-पाटील तसेच आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अंकुर शिंदे, मेजर किरण ढेरे व सहकाऱ्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अ‍ॅड.बाबूराव हिरडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी समर्थ ट्रस्टचे भारत शिंदे, कामगार आयुक्त रेवनाथ भिसले, ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, प्रा. साळुंके, बाळकृष्ण लावंड सर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शिंदे व श्री. नवले यांनी केले, तर आभार प्रदर्शन योद्धा अकॅडमीचे मेजर नाईकनवरे यांनी केले.

यावेळी आजी-माजी सैनिकांचे कुटुंबीय, यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे एनसीसी कॅडेट्स, तसेच करमाळा शहर व परिसरातील भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!