करमाळा (दि.७) – गेले अनेक वर्षे करमाळा-कुर्डवाडी हा रस्ता खड्डेमय होता. या रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत होते. सुदैवाने मागील दीड वर्षापूर्वी करमाळा-कुर्डवाडी या रस्त्याचे रुंदीकरण झाले. चांगल्या प्रतीचा रस्ता झाल्यानंतर अपघात थांबतील अशी अपेक्षा असताना दुर्दैवाने या रस्त्यावर अपघाताचे सत्रच सुरू झाले. दर आठ दिवसाला येथे अपघात होत असून गेल्या वर्षभरात अनेक अपघाती मृत्यू या रस्त्यावर झाले आहेत त्यामुळे या रस्त्यावरील सुसाट वाहणाऱ्या वाहनांचा वेग स्पीड ब्रेकर टाकून अथवा अन्य उपाय करून आवरण्याची गरज निर्माण झालेली आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मागील झालेले काही अपघात – २नोव्हेंबरला पांडेजवळ चारचाकीने दुचाकी ला धडक दिली त्यात वृद्धाचा मृत्यू झाला. ३० ऑक्टोबरला तवेरा गाडीला ट्रकने धडक दिली त्यात १२ जण जखमी झाले. २६ ऑक्टोबर ला पांडे जवळ ट्रॅक्टरने एका चालत जाणाऱ्या व्यक्तीला धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. पांडे गावाजवळ ४ ऑक्टोबरला ट्रक उलटला होता. पांडे गावाजवळ १८ जुलै रोजी दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली,त्यात हिवरे येथील दोघांचा मृत्यू झाला, ३ फेब्रुवारीला सालसे येथे स्वीफ्ट कारने पुलाला धडक देऊन झालेल्या अपघातात दोघेजण ठार तर दोघेजण किरकोळ जखमी झाले. मागील वर्षी २७ डिसेंबरला पांडे जवळ तवेरा गाडी आणि कंटेनरची धडक होऊन त्यात ४ जण जागीच मरण पावले, मागील वर्षी २७ नोव्हेंबर ला बोलेरो पिकअपने पाठीमागून दुचाकीला धडक दिली. त्यात करमाळा येथील पती पत्नी दोघे ठार झाले असे अनेक अपघात घडले आहेत.
संग्रहित छायाचित्र
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला चारचाकीने दिली धडक
अज्ञात चारचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला विरुद्ध बाजूने येऊन जोरात धडक दिली. या धडकेने दुचाकीवर असलेल्या वृद्ध दाम्पत्याला जखमी केले. यात पतीला जास्त मार लागल्याने त्यांचे उपचारापूर्वीच निधन झाले. हा अपघात २ नोव्हेंबरला करमाळा-कुर्डुवाडी रस्त्यावरील पांडे गावाजवळ जवळ सकाळी ८:३० च्या सुमारास घडला.
या अपघातात पांडे येथील वसंत रंगराव वीर (वय ८४ वर्षे) यांचे उपचारापूर्वीच निधन झाले आहे. त्यांची पत्नी लक्ष्मी वसंत वीर (वय ७० वर्षे) यादेखील या अपघातामध्ये जखमी झालेल्या आहेत. त्यांनी करमाळा पोलिसात अज्ञात वाहन विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
या अपघाताविषयी सविस्तर माहिती अशी की, पांडे येथील वीर दाम्पत्य नेहमीप्रमाणे २ नोव्हेंबर ला सकाळी आपल्या पांडे गावाजवळील शेताकडे निघाले होते. पांडे शिवाराजवळ आल्यानंतर स्व. वीर यांनी रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली. व दोघे गाडीवरून उतरत असताना अचानक एक चार चाकी गाडी वेगाने विरुद्ध दिशेने आली व वीर यांच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन पुढे गेली.घडलेल्या अपघातानंतर हा अज्ञात वाहनचालक न थांबता तसाच पुढे निघून गेला.
यातील स्व. वीर यांच्या डोक्याला, छातीला व दोन्हीही पायाला मार लागुन डोक्यातुन रक्त येत होते व ते बेशुध्द झाले होते. त्यांच्या पत्नी देखील खाली पडल्या होत्या. त्यांच्याही हाताला, पाठीला व सर्व अंगावर मुका मार लागुन जखमा झाल्या आहेत. अपघात झाल्यामूळे वीर यांच्या पत्नीने रस्त्यावर मोठयाने ओरडुन हाक मारली असता गावातील काही लोक त्याठिकाणी आले व त्यांनी वीर यांना खाजगी रूग्णवाहिका बोलावून घेवुन उपजिल्हा रूगाणलय, करमाळा येथे घेवुन गेले. डॉक्टारांनी तपासुन वीर यांना उपचारपुर्वी मयत झाल्याचे सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे करत आहेत.