तालुक्यातून दहा दिवसांत पाच महिला बेपत्ता-नागरिकांत चिंतेचे वातावरण

0

करमाळा, ता.२५: तालुक्यात गेल्या दहा दिवसांत तब्बल पाच महिला बेपत्ता झाल्याच्या घटनांनी परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून हा विषय सध्या सर्वत्र चर्चेचा ठरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 22 मार्च रोजी बोरगाव येथील सुमारे 35 वर्षीय तरुणी घरातून निघून गेल्यानंतर परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर 23 मार्च रोजी करमाळा शहरातील 21 वर्षीय तरुणीही बेपत्ता झाली असून तिच्या पालकांनी करमाळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


24 मार्च रोजी मोरवड येथील 20 वर्षीय युवती घरातून निघून गेल्याची घटना घडली असून तिच्याबाबतही पालकांनी हरवल्याची नोंद केली आहे. दरम्यान, 25 मार्च रोजी पांगरे येथील 35 वर्षीय तरुणी आणि उमरड येथील 51 वर्षीय प्रौढ महिला या दोघीही बेपत्ता झाल्याची नोंद करमाळा पोलिसांकडे करण्यात आली आहे.

अशा प्रकारे केवळ दहा दिवसांच्या कालावधीत विविध ठिकाणांहून पाच महिला व तरुणी बेपत्ता झाल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व घटनांची गांभीर्याने दखल घेत पोलीस यंत्रणा तपास करत असून संबंधितांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, या बेपत्ता महिला व तरुणींबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास तात्काळ करमाळा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!