भीमा नदीकाठच्या ४२ तीर्थक्षेत्रांचे महात्म्य सांगणाऱ्या ‘भीमा महात्म्य’ ग्रंथाचे १८ मे ला प्रकाशन

0

करमाळा: कुगाव (ता. करमाळा) येथील रहिवासी व सेवानिवृत्त शिक्षक सीताराम बल्लाळ यांनी संपादित केलेल्या ‘भीमा महात्म्य’ या पुरातन ग्रंथाचे प्रकाशन येत्या १८ मे २०२६ रोजी पंढरपूर येथे होणार आहे. ‘ज्ञानोबा-तुकोबा’ शासन पुरस्कार प्राप्त ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

पंढरपूर येथील ६५ एकर परिसरात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहामध्ये सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेत हा प्रकाशन सोहळा पार पडणार असल्याची माहिती सीताराम बल्लाळ यांनी दिली.


या ग्रंथाचे प्रकाशक ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज खैरनार (शिंपी, आळंदी) हे असून ग्रंथाला ह.भ.प. राणा महाराज वासकर आणि प्रा. सागर महाराज बेलापूरकर यांची प्रस्तावना लाभली आहे. तसेच विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार अमोल कोल्हे आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराचे मुख्य विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, ज्ञानेश्वर महाराज कदम (आळंदी), ॲड.डॉ. बाबुराव हिरडे, सागर पांडुरंग बेलापूरकर महाराज यांनी ग्रंथास शुभेच्छा दिल्या आहेत.

‘भीमा महात्म्य’ हा मूळ ग्रंथ कवी दत्त किंकर यांनी सन १८६७ मध्ये लिहिलेला आहे. या ग्रंथात भीमा नदी श्री भीमा शंकर या तीर्थक्षेत्रापासून कृष्णेला मिळेपर्यंतच्या प्रवासातील ४२ तीर्थक्षेत्रांचे वर्णन ४२ अध्याय व २४४९ ओव्या मधून करण्यात आले आहे. या ग्रंथाच्या मूळ प्रति भांडारकर इन्स्टिट्यूट पुणे व पुरातत्व विभागाकडे उपलब्ध आहेत. या प्रती सर्वांपर्यंत पोहोचाव्यात या भावनेतून श्री बल्लाळ यांनी हा ग्रंथ प्रकाशित करण्याचे ठरवले.

या ग्रंथाविषयी अधिक माहिती देताना श्री बल्लाळ म्हणाले की, सन २००८ मध्ये कुगाव येथील शेतकरी पुंडे काका व बाबू गाडे यांच्या माध्यमातून मला या ग्रंथाबाबत पहिल्यांदा माहिती मिळाली. या ग्रंथामध्ये आमच्या कुगाव गावाचे वर्णन असल्याचे समजले. त्यानंतर मी हा ग्रंथ भांडारकर इन्स्टिट्यूट पुणे येथून घेऊन ग्रंथातील तेविसाव्या अध्यायाच्या ३००० प्रती छापल्या. तत्कालीन आमदार जयवंतराव जगताप यांच्या उपस्थितीत गाव व परिसरात वाटप केल्या होत्या.
या ग्रंथानुसार कुगावचे प्राचीन नाव ‘कुर्मग्राम’ असे असून येथे हनुमानाचा जन्म झाला असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. त्यामुळे या तीर्थक्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास व्हावा, यासाठी मी शासनाकडे विनंती केली आहे. हा ग्रंथ घरपोच हवा असेल तर ८३७९०५८५११ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

सीताराम एकनाथ बल्लाळ

सन २०२० मध्ये कुगावच्या तत्कालीन सरपंच तेजस्विनी दयानंद कोकरे यांनी देखील या ग्रंथातील ३३ व्या अध्यायचे मूळ संस्कृत व मराठीत भाषांतर केलेल्या प्रती प्रसिद्ध करून वाटप केल्या होत्या.

बातमी संपादन : सुरज हिरडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!