जि.प.शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी सुजित बागल यांचा अभिनव उपक्रम; प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी भरणार

करमाळा(प्रतिनिधी) : करमाळा तालुक्यातील मांगी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य सुजित बागल हे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून अभिनव उपक्रम राबवत आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश वाढावा आणि ग्रामीण भागातील शाळा टिकून राहाव्यात या उद्देशाने ते प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी स्वतः भरत आहेत.

मांगी जिल्हा परिषद शाळेतील घटती पटसंख्या लक्षात घेऊन सुजित बागल यांनी मागील वर्षी गावासह पंचक्रोशीतील पालकांना आपल्या मुला-मुलींना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या उपक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिणामी, २० पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश मांगी जिल्हा परिषद शाळेत घेतला. या सर्व २० पालकांची घरपट्टी सुजित बागल यांनी स्वतः ग्रामपंचायतीमध्ये भरली होती.
मागील वर्षीप्रमाणे यंदाही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यावर्षी जवळपास १८ पालकांनी आपल्या मुला-मुलींचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेत घेतला असून त्या सर्व पालकांची घरपट्टीही सुजित बागल स्वतः भरणार आहेत.

याबाबत बोलताना सुजित बागल म्हणाले, “विद्यार्थी पटसंख्या कमी झाल्यामुळे अनेक जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या शाळा टिकून राहाव्यात यासाठी मी यापुढेही तन, मन आणि धनाने कार्यरत राहणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक पालकाने आपल्या मुला-मुलींना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश द्यावा.”
यावेळी मांगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत वीर, वैशाली शेटे, सुनिता काळे, आशा देमुंडे, निखील बागल, आण्णासाहेब बागल तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
सुजित बागल हे सतत विविध उपक्रम राबवत सामाजिक कार्य करत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी मागील काही वर्षांत हजारो वृक्षांची लागवड केली आहे. येत्या काळात मांगी व परिसरात किमान पाच हजार पर्यावरणपूरक वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.

