जेऊर येथील बागकामाची आवड असणाऱ्या प्राथमिक शिक्षकाने टेरेसवरिल बागेत केला 250 पेक्षा ज्यास्त रेन लिली प्रकारांचा संग्रह - Saptahik Sandesh

जेऊर येथील बागकामाची आवड असणाऱ्या प्राथमिक शिक्षकाने टेरेसवरिल बागेत केला 250 पेक्षा ज्यास्त रेन लिली प्रकारांचा संग्रह

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : जेऊर (ता.करमाळा) येथील बागकामाची आवड असणाऱ्या प्राथमिक शिक्षक विवेक पाथ्रुडकर यांनी आपल्या टेरेसवरिल बागेत वर्षा लीलीच्या 250 पेक्षा ज्यास्त प्रकारांचा संग्रह केला असून अनेक बागप्रेमी मंडळी ते पहाण्यासाठी त्यांच्या टेरेस गार्डनला भेट देत आहेत.

बागप्रेमी शिक्षक विवेक विलास पाथ्रुडकर ,ज्यांनी आपली बागकामाची आवड जपत थोडीशी वेगळी वाट चोखाळत वर्षा लिली (रेन लिली) च्या प्रकारांचा संग्रह केला आहे.
पेशाने शिक्षक असलेले विवेक पाथ्रुडकर हे चिखलठाण नं २ (ता.करमाळा) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतात. आपल्या उपजतच असलेल्या बागकामाच्या छंदाला जागतिक व्यासपीठ देत ” कल्पवृक्ष ” हा फेसबुकवरील बागकामाचा समूह सुद्धा ते चालवतात.या समूहाच्या माध्यमातून ते भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक हौशी बागप्रेमींशी जोडले गेले आहेत.

यातूनच त्यांनी गेल्या तीन चार वर्षापासून भारताच्या विविध भागातूनच नव्हे तर परदेशातून सुद्धा विविध प्रकारच्या एक-दोन नव्हे तर 250 पेक्षा अधिक रेन लिलींच्या प्रकारांचा संग्रह केला आहे. आपल्याकडे साधारण एप्रिल,मे पासून दिवाळीपर्यंत रेन लिलीच्या फुलांचा बहर असतो. दमट हवा आणि थोडासा पाऊस असे अनुकूल वातावरण मिळाले की रेनलिली बहरतात आणि अतिशय सुंदर दिसणारी विविधरंगी आणि विविध आकाराची ही फुले बागेची अतिशय शोभा वाढवतात आणि त्यामुळे दक्षिण आणि उत्तर भारतात यांचा जास्त प्रसार आहे.

महाराष्ट्रात सुद्धा या सुंदर फुलांचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून ते सतत प्रयत्नशील दिसून येतात आणि फेसबुकवरील ग्रुपच्या माध्यमातून ते तसे प्रयत्न करताना दिसतात. रेनलिलीचे कंद साधारण एप्रिल /मे मध्ये लावतात आणि पावसाच्या आगमनाने यांचा बहर सुरू होतो तो पाऊस असेपर्यंत राहतो.यांचे पुनरूत्पादन कंदापासून होते तर परागीभवनातून मिळणाऱ्या बियांपासून पण लागवड करता येते.

अनेक प्रयोग आणि कृत्रिम परागीकरणातून रेन लिलीच्या नवनवीन संकरीत वाणांची निर्मिती सुद्धा त्यांनी केलेली आहे. जागेची कमतरता असूनही टेरेसवरील मोकळ्या जागेचा पुरेपूर वापर करत टाकाऊ वस्तूंचाच पुनर्वापर करत त्यांनी २५०हून अधिक निरनिराळ्या रोपांची लागवड केलेली आहे. गतवर्षीच्या कोरोना काळातील लाॅकडाऊनमध्ये जेव्हा घराबाहेर पडायला संधी नव्हती अशा काळात जास्तीत जास्त बागकामात रमत त्यांनी बागकामाचे नवनवीन प्रयोग करत घनकचरा व्यवस्थापन, विविध सेंद्रिय पण घरगुती खतांची निर्मिती आणि वापर यावर भर देत आपली बाग बहरवली आहे. त्यांची बाग पाहण्यासाठी अनेक लोक आवर्जून भेट देतात. आपल्या भागात सुद्धा रेन लिलीच्या फुलांचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा आणि रेन लिलीचे जवळजवळ सगळे प्रकार संग्रही असावेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.


Sonaraj metal and crockery karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!