आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामास अडथळा; राशीनच्या चौघांसह इतर सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल

करमाळा (दि.१) : तालुक्यातील रामवाडी येथील गट नं. ३९ मध्ये कृष्णा मराठवाडा सिंचन योजना क्र. ३ अंतर्गत आष्टी उपसा सिंचन योजनेचे काम सुरू आहे. या योजनेच्या पंप हाऊसचे बांधकाम करणाऱ्या मजुरांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करणारां विरोधात करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व या कामाचे साईट इन्चार्ज ऋषिकेश बाबासाहेब गव्हाणे (रा. कारखेल खुर्द, ता. आष्टी, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कृष्णा मराठवाडा सिंचन योजना क्र.३ अंतर्गत आष्टी उपसा सिंचन योजना क्र.३ च्या पाईपलाईनचे काम हैदराबाद (तेलंगणा) च्या पीव्हीआर प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीने घेतले आहे. करमाळा तालुक्यातील रामवाडी येथे या योजनेच्या पंप हाऊसचे बांधकाम सुरू आहे. दि. १९/१२/२४ रोजी साईट इन्चार्ज म्हणून ते या कामावर गेले असता पीव्हीआर कंपनीचे मॅनेजर रत्नया रमनैया रेनंगी यांनी गव्हाणे यांना सांगितले की दि. १८/१२/२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता श्याम कानगुडे, केशव रसाळ, वैभव काळे, सचिन मांडगे (सर्वजण रा. राशीन, ता. कर्जत जि. अहिल्यानगर) व इतर ७ ते ८ अनोळखी इसमांनी कामावर असणाऱ्या शेख अब्दुल सत्तार, रुद्रराजू बालाजी, लब बाबरी, यारासी मल्लिकार्जुना, अमेश कुमार कुशवाहा, शामलदास यांना शिवीगाळ, दमदाटी व काठीने मारहाण करून दुखापत केली आहे म्हणून त्यांचे विरुद्ध तक्रार आहे.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ऋषिकेश गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी कानगुडे, रसाळ, काळे मांडगे आणि इतर ७ ते ८ जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक पी. बी. टिळेकर हे पुढील तपास करत आहेत.




