रुग्णालय की करुग्णालय?

मागच्या आठवड्यात राज्यातील नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथे बालकांच्या मृत्यूचे सत्र झाले. तीन डजन पेक्षा जास्त मृत्यूचा आकडा गेल्यावर राज्य सरकार आणि सर्व सामान्य नागरीक हादरला. प्रत्येक शहरातील रुग्णालयाची चर्चा सुरू झाली असून रुग्णालयाच्या बाबतीत करमाळा हा तर मागासलेला तालुका आहे.
✍️ संपादकीय
मनुष्याचे आर्युमान वाढलेले आहे, पण अनेक माणसं कमी वयात मरत आहेत हे ही सत्य आहे. कोरोना सारख्या आजाराने आर्युमान वाढूनही त्याचा उपयोग झाला असे
वाटत नाही. पुर्वी सुविधा नव्हत्या. प्लेग सारख्या साथीत किंवा अन्य साथीत माणसं ढिगाने मरत होते. अलीकडे सुविधा वाढल्या आणि मनुष्याचे जीवन खुपच नाजुक होत
चालले आहे. साधनं आणि सुविधा वाढल्या आणि त्यात माणूस पंगु बनला आहे. श्रम कमी झाले त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. प्रत्येक घरा-घरात बाल्यावस्थेपासून रुग्ण निर्माण होऊ लागले आहेत. पुर्वी ५०-६० वर्षाचा माणूस मरण पावला तर सर्व गाव हळ-हळ करायचे, अलीकडे २५-३० वर्षातील युवक चालता-बोलता मरत आहेत. हे गांभिर्याने घेतले जातेच असे वाटत नाही. ७/८ वर्षाच्या मुलाला मधुमेह, १० – १२ वर्षाच्या किशोर मुलाला रक्तदाब, १८ – २० वर्षाचा युवकाला ह्रदयरोग असे चित्र दिसू लागले आहे. हा प्रकार केवळ शहरातच नाहीतर ग्रामीण भागातही वाढत चालला आहे. प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथी व माध्यमिक शाळेतील पाचवी ते दहावी पर्यंतच्या मुलांची शासनामार्फत दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी होते. या तपासणीमध्ये जवळपास १० टक्के मुले गंभीर अजाराने त्रस्त असल्याचे निष्पन्न झाले आहे. याची कारणे म्हणजे विषारी अन्नधान्य. रासायनिक खतापासून निर्माण केलेले अन्न आणि जर्सी गायीचे दुध हे घातक पदार्थ आहेत.
ज्या घरात रुग्ण आहे ते घर त्रस्त असते. त्या घरात दवाखान्याचा खर्च, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ आणि नेमके काय होणार याची चिंता. यामुळे गावा-गावातील लोक चिंताग्रस्त आहे. करमाळा शहर व तालुक्यातील आजारी परिवार त्रस्त असण्याचे कारण म्हणजे या तालुक्यात सर्व सुविधा असलेले अद्ययावत एकही रुग्णालय नाही. आमदार
संजयमामा शिंदे यांनी तालुक्यातील रुग्णाच्या सुविधेसाठी शासन दरबारी प्रयत्न केले, तसेच माजी आमदार नारायण आबा पाटील यांनीही प्रयत्न केले. त्यामुळे उपजिल्हा
रूग्णालयासाठी यंत्रसामुग्री, इमारती, कर्मचारी व ५० खाटावरून ते १०० खाटापर्यंत प्रवास उपजिल्हा रुग्णालया चा झालेला आहे ही चांगली बाब आहे परंतु एवढे पूरेसे नाही. अलीकडे करमाळा शहरात सीटीस्कॅन व तत्सम यंत्रसामुग्री आलेल्या आहेत पण एम. आर. आय. ची सुविधा येथे नाही. तालुक्यात सर्व प्रकारच्या सुविधा अद्याप एका छत्राखाली आलेल्या नाहीत. सध्या जे डॉक्टर आहेत ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात परिपुर्ण आहेत, याबाबत दुमत नाही. पण एकाच छत्राखाली सर्व प्रकारच्या सुविधा असलेले व अद्ययावत यंत्रसामुग्री असलेले एकही रुग्णालय नाही, ही येथील मोठी खंत आहे.
एकाच रुग्णाला वेगवेगळे आजार असतात, अशावेळी त्या रुग्णाची पंचायत होते. असा रुग्ण ज्या डॉक्टरकडे जातो, त्यावेळी संबंधित डॉक्टर ज्यामध्ये तज्ञ आहेत त्यावर ते परिपुर्ण उपचार करतील पण अन्य आजारावर काय..? शरीरावर उपचार करणारा डॉक्टर हृदय रुग्णावर कसा उपचार करणार..? हृदयावर उपचार करणारे डॉक्टर मेंदूवर कसा उपचार करणार ..? हा प्रश्न आहे. रुग्ण हा एकच आजार घेऊन रुग्णालयात येत नाही. आजाराची साखळी असते, एकातून एक अजार वाढतात. समजा एखादा रुग्ण एखाद्या रुग्णालायात गेलातर त्याच्यावर उपचारासाठी बाहेरचे डॉक्टर बोलावले जात नाहीत अथवा बाहेरचे डॉक्टर संबधित रुग्णालयात जात नाहीत. एकच डॉक्टर आपल्या कुवतीनुसार सर्व आजारावर उपचार करत असतो. जर उपचार योग्य झालातर ठीक पण योग्य उपचार झाले नाहीतर..? त्यामुळे रुग्णावर विपरीत परिणाम होतो, जेंव्हा रुग्ण गंभीर होतो तेंव्हा त्या रुग्णाला मोठ्या शहराचा मार्ग दाखवला जातो. वेळेवर उपचार न झाल्यामुळे रुग्णाला जास्त काळ बाहेरगावच्या दवाखान्यात रहावे लागते किंवा प्राणाला मुकावे लागते.

तालुक्यात कोठेही २४ तास सेवा उपलब्ध नाही. प्रत्येक दवाखान्यात तेच नेहमीचे डॉक्टर व त्यांचा स्टाफ असतो. जर त्या डॉक्टरांना महत्वाच्या कामासाठी बाहेर गावी जायची वेळ आलीतर नेहमीच्या रुग्णाचे हाल होतात. तो रुग्ण अन्य डॉक्टराकडे गेलातर तिथे पुन्हा बे पासून सुरवात होते. पुन्हा सर्व तपासण्या कराव्या लागतात वैगरे वैगरे… थोडक्यात काय तर पर्याय नसल्यामुळे रुग्णाला त्रास होतो. दुसरी गोष्ट म्हणजे नियमीत (फॅमीली) डॉक्टर दिवसभर काम करून थकतात, रात्री ते झोपल्यानंतर १२ – १ वाजता रुग्ण दवाखान्यात गेला तर व डॉक्टरांना उठवले तर त्यांची रुग्ण पाहण्याची मानसीकता राहू शकते का..? डॉक्टरसुध्दा माणूस आहे, हे विसरून चालणार नाही. रात्री झोपेतून उठलेले डॉक्टर रुग्णाला स्वत:च्या मानसिकतेतूनच तपासणार. काहीजण लक्षपूर्वक तर काहीजण कसे-
बसे तपासणार आणि वाटेला लावणार. त्याचा परिणाम रुग्णाच्या जीवावर होतो. अजुनही शहरात सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिका नाही. गंभीर रुग्णाला बाहेर गावी पाठवायचेतर
डॉक्टरसह सर्व सुविधा असणारी रुग्णवाहिका पाहिजे. या शहरात भुलतज्ञ नाही, अशा एकापेक्षा अनेक अडचणी आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी येथे एक धर्मादाय तत्वावर मोठे रुग्णालय होणे गरजेचे आहे. तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकिय कार्यकर्तेयांच्यासमोर हे आव्हान आहे. अद्यायवत रुग्णालय नसल्याने तालुक्यातील शेकडो रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. मागे एक बस चालकाला छातीत त्रास होऊ लागला, त्याने बस डेपोत लावली व एका खासगी रुग्णालयात गेला, तेथील डॉक्टरांनी त्याची स्थिती पाहून त्याला कुटीर रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तो चालक कुटीर रुग्णालयात गेला पण त्या दवाखान्याच्या पायऱ्या चढल्याबरोबर तो कोसळला तो उठलाच नाही. असे अनेक प्रकार होतात पण हे संबंधित गावात किंवा संबंधित नातेवाईकांना समजते. इतरांना मात्र समजत नाही. त्यामुळे येथे अद्ययावत रुग्णालय उभारण्यासाठी मोठ्या प्रयत्नाची गरज आहे.

लोकप्रतिनिधीनी ठरवले तर अशक्य नाही, समाजातील
काही सधन मंडळीनी एकत्र येवून ठरवले तर त्यांनाही अशक्य नाही. अकलूज, नगर, सोलापूर, पुणे येथे पाच-पाच डॉक्टर एकत्र आले व त्यांनी अद्ययावत रुग्णालय उभारले
आहे. तसा येथे प्रयोग करायला हरकत नाही. मध्यंतरी स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान मार्फत एक प्रयत्न झाला, पण छोटी डिस्पेन्सरी सुरू करून उपयोग नाही. जोपर्यंत मोठे रुग्णालय होत नाही, तोपर्यंत अद्ययावत रुग्णवाहीका हा प्रयोग उपयुक्त ठरू शकतो आणि दुसरा पर्याय म्हणजे येथील काही डॉक्टरांनी एकत्रित येऊन एकाच छत्राखाली अद्ययावत यंत्रसामुग्रीसह रुग्णालय उभारले पाहिजे. या रुग्णालयाची २४ तास सेवा कार्यान्वीत झाली पाहिजे व एकाच छत्राखाली सर्व उपचार योग्यप्रकारे शिवाय कमी खर्चात झाले तर खुप मोठा ताण कमी होणार आहे व अनेक रुग्णांना पुर्नजन्म मिळणार आहे. कुटीर रुग्णालयाच्या बाबतीतील अनुभव म्हणजे बाळंतपणाला गेलेली महिला
किंवा थोडा गंभीर रुग्ण असेलतर किंवा हाड मोडले तरी सोलापूरला पाठवण्याची तजबीज केली जाते. मग अशा ठिकाणी रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक तिकडे कसे फिरकतील..? शासनाने शंभर कॉट एवढी मोठी सुविधा येथे देवूनही जर आपले लक्ष नसेल तर त्याचा उपयोग काय आहे. येथील अनेक पदे रिक्त आहेत. असो या सर्व बाबीचा विचार करता एकच गोष्ट महत्वाची आहे की तालुक्यातील आरोग्य हा विषय गंभीर आहे व सर्वचजण त्याकडे
दुर्लक्ष करत आहेत, त्याचे परिणाम अनेकांना भोगावे लागले आहेत. संबंधितांनी याकडे लक्ष दिले नाहीतर त्याचा फटका एकदिवस त्यांना सुध्दा बसेल पण त्यावेळी फार उशीर
झालेला असेल. असे काही घडण्यापुर्वी समाजातील जाणत्या व्यक्तींनी विशेषतः लोकप्रतिनिधींनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी सावध होण्याची गरज आहे.
✍️ डॉ.अॅड.बाबूराव हिरडे,करमाळा, मो.९४२३३३७४८०

