उजनीचे बॉडीगार्ड कोण? - Saptahik Sandesh

उजनीचे बॉडीगार्ड कोण?

प्रत्येक प्रतिष्ठीत व्यक्तीच्या संरक्षणाची जबाबदारी ही बॉडीगार्डकडे असते. तर मौल्यवान वस्तूची जबबादारी ही सुरक्षा यंत्रणेवर असते. सुरक्षा यंत्रणा मजबुत असेलतर मौल्यवान वस्तु सुरक्षित असतात. सुरक्षा यंत्रणा जर ढिसाळ असेलतर मौल्यवान वस्तूची चोरी व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे बँका, एटीएम तसेच अत्यंत महत्वाच्या  वास्तू सांभाळण्यासाठी सुरक्षित यंत्रणा नेमलेली असते. अलिकडे करमाळा तालुक्याच्या दृष्टीने उजनी धरण हे अत्यंत मौल्यवान आणि अत्यंत प्रतिष्ठीत स्वरूपाचे आहे. एवढेच नव्हेतर उजनी धरण हे तालुक्यातील शेतकऱ्यांचे हृदय आहे. हृदय बंद पडलेतर जसा प्राण जातो, तसे उजनी धरण असुरक्षित झालेतर शेतकऱ्याचा प्राण जावू शकतो; अशी स्थिती या तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे.

उजनी धरणाचे बांधकाम १९६९ ला सुरू झाले आणि प्रत्यक्षात अकरा वर्षानंतर जलाशय पूर्ण होऊन १९८० ला प्रत्यक्षात कालव्यातून बाहेर पडले. या धरणाचा खर्च ८ हजार ३२९ कोटी ६ लाख रूपये झालेला आहे. या धरणाची उंची १८५ फुट असून लांबी ८ हजार ३१४ फूट आहे. या धरणाची वरची उंची २२ फुट आहे. ४१ दरवाजे असलेल्या या धरणाला यशवंतराव चव्हाणांचे म्हणजे यशवंत सागर असे नाव दिले आहे. या धरणाचे  पाणलोट क्षेत्र १४ हजार ८५० किलोमीटर लांबीचे आहे. तर पृष्ठ भाग ३३७ किलोमीटर आहे. धरणातून १२ मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता आहे. धरणामध्ये ५३.५७ टीएमसी पाणी उपयुक्त साठा असतो. तर ६३.६६ टीएमसी मृतसाठा असतो. एकूण १२३ टीएमसी पाणीसाठा असतो, त्यापैकी ११७ टीएमसी पाण्याचे नियोजन होते. या धरणावर शंभर पाणीपुरवठा योजना असून १४ एमआयडीसीला पाणी पुरविले जाते. उजनीच्या पाण्यावर ५४ साखर कारखाने चालतात. सोलापूर शहरासाठी तसेच बार्शी, अक्कलकोट, लातूर अशा वेगवेगळ्या गावांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उजनीचे पाणी दिले जाते. सोलापूर, पुणे आणि नगर अशा तीन जिल्ह्यांना उजनी धरण वरदायिनी म्हणून ठरलेले आहे.

गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने उजनी धरणात फक्त ६६ टक्के पाणीसाठा झाला होता. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पाण्याचे नियोजन नीट न झाल्याने उजनी जलाशयात गेल्यावर्षी सर्वात निचांकी पातळी म्हणजे उणे ६६ टक्के पाणीपातळी झाली होती. यावर्षी ४ ऑगस्ट २०२४ ला १०० टक्के पाणीसाठा झाला होता. असे असलेतरी या धरणात गाळ व गाळमिश्रीत वाळू ११५२ लाख ब्रास असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या उजनी जलाशयासाठी करमाळा तालुक्यातील जवळपास ४० गावांना मोठा त्याग सहन करावा लागला आहे. प्रत्यक्षात २४ गावांना जलसमाधी मिळाली आहे. असे असताना उन्हाळ्यामध्ये गरज असताना या उजनीचे पाणी बॅक वॉटरवरील शेतकऱ्यांना दिले जात नाही. उन्हाळ्यामध्ये धरण मायनस मध्ये गेले की शेतकऱ्याची वीज कमी करून शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो. पिण्याच्या पाण्याचे नाव सांगत शेतकऱ्यांना त्रास दिला जातो. याचे कारण पाटबंधारे विभागाचे ढिसाळ नियोजन आणि शासनाचे स्वार्थी धोरण, आमदार आणि मंत्र्यांचे साटेलोटे यामुळे हे पाणी कधीही आणि कितीही  सोडले जाते. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. खालच्या लोकांना व आमदारांना खुश ठेवण्यासाठी पाण्याचे नियोजन हे मोडीत काढले जाते. आजपर्यंत सोलापूरला पिण्याचे पाणी देण्याच्या नावाखाली किती पाणी वाया घालविले आहे. २०२५ मध्ये दुहेरी पाईपलाईनद्वारे उजनीचे पाणी सोलापूरला जाईल तेव्हा पाण्याची बचत होवू शकेल.

सध्या उजनीमध्ये १०३ टीएमसी पाणी आहे. २६ डिसेंबर पासून जलसंपदा विभागाने पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली भीमा नदीतून २ हजार क्युसेस पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असून हळूहळू ते पाणी ६ हजार क्युसेस प्रमाणे सोडले जाणार आहे. कारण नसताना असे जर पाणी सोडले जात असेलतर उन्हाळ्यात हे धरण आपोआप मायनस मध्ये जाते. त्याचा फटका उजनी बॅकवॉटरकडील शेतकरी व दहिगाव  उपसा सिंचन योजनेवर अवलंबून असणारे शेतकरी यांना बसणार आहे. त्यामुळे उजनी धरणाची विशेषत: उजनी धरणाच्या पाण्याची काळजी घेण्याची गरज महत्वाची आहे. त्यामुळे उजनी धरणाचे बॉडीगार्ड म्हणून प्रशासनातील प्रतिनिधींना काम करावे लागेल. एवढेच नव्हेतर लोकप्रतिनिधी आमदार नारायण (आबा) पाटील व तालुक्यातील सर्वच राजकीय व्यक्ती तसेच शेतकऱ्यांनाही बॉडीगार्ड म्हणूनच काम करावे लागेल. अन्यथा मागील दिवस पुन्हा येण्यास वेळ लागणार नाही; यासाठी सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे..!

✍️डॉ.अ‍ॅड.बाबूराव हिरडे, करमाळा, जि. सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!