सहा जणांच्या त्रासाला कंटाळून तरूणाची आत्महत्या - गुन्हा दाखल.. - Saptahik Sandesh

सहा जणांच्या त्रासाला कंटाळून तरूणाची आत्महत्या – गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : सहा जणांच्या त्रासाला कंटाळून त्यांचे नावे व्हीडीओ बनवून घरातील अँगलला गळफास लावून तरूणाने आत्महत्या केली आहे. हा प्रकार अंजनडोह (ता.करमाळा) येथे ३ जूनला सायंकाळी सव्वाआठच्या सुमारास घडला आहे.

या प्रकरणी नितीन बापू चव्हाण (रा. पळसावाडे, ता.माण, ह.रा.अंजनडोह) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझे मामा महादेव बन्सी रणदिवे (वय – ३५, रा. अंजनडोह) यांनी ३ जूनला रात्री सव्वाआठच्या सुमारास घरातील पत्र्याच्या अँगलला गळफास लावून आत्महत्या केली आहे.

सदरची आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हीडीओ तयार केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे, की भैय्या उर्फ सूरज केशव गोरे, महादेव दशरथ माने, केशव गोरे (सर्व रा. अंजनडोह) तसेच अनिल कांबळे, राजाबाई कांबळे व अजय कांबळे (सर्व रा. रोशेवाडी) या सर्वांनी मला मानसिक त्रास देऊन छळ केला आहे. माझ्या पत्नीची छेडछाड केली असून, माझ्या पत्नीला तिचा भाऊ घेऊन जातो. या सर्वांमुळे मी आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर पोलीसांनी या सहा जणांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यात पुढील तपास पोलीस उपअधिक्षक अजित पाटील हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!