शेटफळच्या अल्पशिक्षित तरूणाची उद्योग व्यवसायात भरारी… - Saptahik Sandesh

शेटफळच्या अल्पशिक्षित तरूणाची उद्योग व्यवसायात भरारी…

सामान्य शेतकरी कुटुंबातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत छोट्या व्यवसायातून स्वतः ची ठिबक उत्पादन कंपनी सुरू करून, उद्योग क्षेत्राकडे यशस्वीपणे वाटचाल करणाऱ्या शेटफळ (ता.करमाळा) येथील तरुण उद्योजक वैभव पोळ यांचे उद्योग क्षेत्राबरोबरच गावातील गटशेती बरोबरच विविध सामाजिक कार्यातही महत्वाचे योगदान आहे.

वैभव पोळ यांचा जन्म शेटफळ येथील सामान्य शेतकरी कुटुंबात झाला वडील वसंतराव पोळ व आई उषाबाई दोघे शेती करतात मोठे भाऊ किरण पोळ यांनीही शालेय जिवनापासूनच प्रतिकूल परिस्थितीत करमाळा येथे फोटोग्राफी व्यावसाय करून स्वतः चे शिक्षण करून स्वकर्तृत्वाने आपली प्रगती साधली. घरची वडिलोपार्जित शेती असली तरी ती फारशी डेव्हलप केलेली नव्हती. त्यामुळे वैभव यांनी आठवीपर्यंत शिक्षण घेऊन शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी वडीलांना शेतात मदत करायला सुरुवात केली, शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा वापर करून शेतीमधील उत्पादन वाढवण्यात ते यशस्वी झाले.

त्यांनी गावातील समविचारी मित्रांना एकत्र करून सहकारी दुध संस्था सुरू केली.आठ दहा वर्षे ती यशस्वीपणे चालवली यानंतर त्यांचा विवाह राजूरी येथिल निवृत्ती साखरे यांची कन्या नीता यांच्याशी झाला त्यांना दोन‌ मुली आहेत. दुधसंस्था चालवताना त्यांना व्यवहाराची ओळख झाली, यातूनच त्यांनी गावात शेती उपयोगी वस्तूंचे दुकान सुरू केले. हे करत असताना गावातील समविचारी मित्रांचे संघटन करत नागनाथ शेतकरी गटाची स्थापना केली या गटशेतीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत केळी ऊस या पिकांमध्ये भरघोस उत्पादन साधत शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रयत्न होत आहेत, यामध्ये त्यांची भुमिका महत्वाची आहे.

लहानपणापासून समाजात मिसळण्याची सामाजिक कार्यात पुढाकार घेण्याची वृत्ती असल्याने लोकांशी चांगला संपर्क होता. त्यांच्या स्वतः च्या दुकानाला चांगला प्रतिसाद मिळत गेला. त्यांची व्यावसायिक प्रगती पाहून कृषी क्षेत्रातील जैन इरिगेशनसारख्या कंपन्यांची पाईप, ठिबक संच केळी रोपे याची डिलरशीप मिळाली.जिल्हात त्यांचा दांडगा जनसंपर्क आसल्याने त्यांचा व्यावसायात चांगला जम बसला. व्यावसायात मालवहातूकीसाठी दोन मोठे आयशर खरेदी केले.

गावातील शेतकऱ्यांना नामांकित कंपनीचे ठिबक सिंचन संचाच्या किमती जादा वाटत असल्याने कमी किमतीमध्ये तयार होणारे ठिबकची मागणी वाढत आहे ही बाब लक्षात येताच त्यांनी स्वतःची ठिबक उत्पादक कंपनी उभारण्याचा निर्णय घेतला जळगाव नाशिक,औरंगाबाद या ठिकाणी जाऊन माहीती घेतली व आपल्या स्वतःच्या शेतात परिसरातील पहीली ठिबक उत्पादक कंपनी सुरू केली.या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जुने ठिबक विकत घेऊन त्यांना वाजवी किमतीमध्ये नवीन ठिबक देण्यास सुरुवात केल्याने लोकांच्या खर्चात बचत होऊ लागल्याने त्यांना शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

स्वत:चा व्यावसाय उद्योग स्थिरस्थावर करत असतानाच गावातील प्रत्येक सामाजिक कार्यासाठी सढळ हाताने मदत करण्याची त्यांची भुमिका असते गावातील जिव्हाळा ग्रुपच्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान असते.गावतील गरजूंना संसासारोपयोगी वस्तू, कपडे देणे असो गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत गावातील निराधार वृद्धांसाठी जेवण्याच्या डब्याची सोय करणे अशी कामे ते करीत असतात.याशिवाय गावातील गरजूंना मुलीच्या लग्नासाठीचा खर्च असो किंवा कोरोना काळात लोकांना वैद्यकीय उपचारासाठी मदत केलेली आहे. अशाप्रकारे आपल्या उद्योग व्यवसायात प्रगती साधना बरोबरच गटशेतीसाठी पुढाकार घेत गावातील गरजूंना कायम मदत करणारे वैभव पोळ यांचे योगदान शेटफळ गावासाठी कायमच महत्त्वाचे ठरलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!