“दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करू” या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन तुर्त स्थगित

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.४:“दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करू” या वीजवितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता श्री. कलावते यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी सुरु केलेले आंदोलन तुर्त र्स्थगित केले आहे.

करमाळा तालुक्यातील जातेगाव, कामोणे, खडकी, पोथरे व बिटरगाव आदी गावांतील शेतकऱ्यांनी आज वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले होते. सततच्या कमी दाबाच्या व अनियमित वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत “जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून विनाअन्न-पाणी हलणार नाही” अशी ठाम भूमिका घेतली होती.हे आंदोलन संतोष वारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले होते. आंदोलनास अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला आणि विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

दरम्यान, तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी पांडकर, वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता श्री. कलावते तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीजा म्हस्के यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.

या आंदोलनात जातेगावचे तुषार शिंदे,खडकी येथील जनार्दन शिंदे, कल्याण शिंदे, पुनवरचे धुमाळ, कामोणे येथील सचिन नलवडे, पंकज नलवडे, पोथरे येथील शिवाजीराव जाधव, बिटरगावचे अतुल मुरूमकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.
वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही श्री. वारे यांनी यावेळी दिला आहे.
