केम येथे हनुमान चालीसा वर्धापन दिन उत्साहात साजरा

केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यातील केम येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात दर शनिवारी जयंत गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या हनुमान चालीसा पठणाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १५ ऑगस्ट रोजी हनुमान चालीसा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकल हिंदू समाज व बजरंग दलाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमानिमित्त सकाळी ८ वाजता श्री हनुमान मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ झाला. त्यानंतर रात्री ७.३० ते ९.३० या वेळेत ह.भ.प. बोराडे महाराज यांचे कीर्तन झाले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती उपस्थितांना दिली.

कार्यक्रमादरम्यान कुर्डूवाडी येथील ह.भ.प. संतोष वाळुजकर महाराज यांचे चिंतन झाले. त्यांनी ‘गाय वाचवा, देश वाचवा’ असा संदेश उपस्थितांना दिला.
यावेळी रामकृष्ण महाराज, ह.भ.प. वाडकर महाराज, हनुमंत गिरी महाराज यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री साडेनऊ वाजता हनुमानाची आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी हजारो भाविकांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बजरंग दल व सकल हिंदू समाजातील बांधवांनी परिश्रम घेतले.



