करमाळ्यातील ‘जीन मैदानातील’ ‘व्यापारी संकुल’ समस्येच्या गर्तेत – प्रशासनाने ‘तात्काळ’ दखल घेण्याची गरज..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : शहरातील तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी नागरीकांना खरेदीसाठी व्यापार पेठ निर्माण करण्यासाठी व नगरपालिकेला उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यासाठी येथील जीन मैदानावर सुरू केलेले माजी आमदार नामदेवरावजी जगताप व्यापारी संकुल हे समस्येच्या गर्तेत असून, पालिका प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन सुधारणा करण्याची गरज आहे.

शासनाकडून नगरपालिकेसाठी जीन मैदानाच्या जागेवर आरक्षण टाकले. त्यानंतर त्याचा वाद उच्च न्यायालया पर्यंत गेले. न्यायालयीन वाद मिटल्यावर या जीन मैदानाची मालकी पालिकेकडे आली आणि त्यानंतर पालिकेने माजी आमदार कै.नामदेवरावजी जगताप व्यापारी संकुलाची उभारणी २००५ ते २०१४ या कालावधीत टप्प्या टप्प्याने केली आहे.

या संकुलामध्ये ए, बी १, बी – २, बी – ३, सी, डी असे विविध ब्लॉक बांधण्याची संकल्पना मांडली होती. त्यापैकी डी ब्लॉक फक्त कागदावरच राहिला. इतर ब्लॉक मध्ये मिळनू शंभर ते सव्वाशे गाळे बांधण्यात आले. याचबरोबर विविद ब्लॉक मध्ये स्वच्छतागृहे बांधली. गटारी बांधल्या, बोअर घेतला, पाण्याच्या टाक्या बसविल्या. पिण्याच्या पाण्याचा नळ बसविण्यात आला. वीज कनेक्शन उपलब्ध करून दिले. स्ट्रीट लॅम्प बसविले. पार्किंगसाठी जागा केली. कंपाउंड बांधले प्रवेशद्वार बांधले आदी सर्व सुविधा दिल्या. सन २००५ ला सुरू झालेल्या या व्यापारी संकुलाचे जसजसे टप्प्याने बांधकाम झाले तसतसे हे गाळे व्यावसायिकांना लिलाव करून उपलब्ध करून दिले. २०१४ पर्यंत व्यापारी संकुलाचे काम पूर्ण झाले व सर्व गाळे व्यावसायिकांना उपलब्ध करून दिले.
सन २००५ ते २०१४ या कालावधीत हे व्यापारी संकुल टप्प्याटप्प्याने बांधण्यासाठी त्यावेळीचे जवळपास अडीच कोटी रूपये खर्च करण्यात आला. असे असलेतरी आज या व्यापारी संकुलाची दक्षा पाहवत नाही. अनेक गाळे पावसाळ्यात गळतात. व्यावसायिक त्याला डागडुजी करून वापरत आहेत. अनेक ठिकाणी टेरेस वरचे कठडे पडलेले दिसतात, आहेत ते कठडे सुध्दा भक्कम नाहीत. काही ठिकाणी त्यांचे गज उघडे पडले आहेत. व्यापारी संकुलाला केलेले कलरिंग काम कुठे विरून गेले कळत नाही. व्यापारी संकुलाच्या परिसरात सिमेंटचे रस्ते अथवा सिमेंटचे ब्लॉक्स टाकले नसल्याने रस्त्यावरचा धुरळा थेट दुकानात उडून जातो. याचा व्यावसायिकांना त्रास होतो. व्यापारी संकुलात विविध ब्लॉक्स मध्ये बांधलेले स्वच्छतागृह पूर्णपणे अस्वच्छतागृह बनलेले आहेत. स्वच्छतागृहाची काही लोकांनी मोडतोड केलेली दिसते. दारे गायब झालेली दिसतात. ती इतकी अस्वच्छ बनली आहेत की इथे कुणी पाऊलच ठेऊ शकत नाही. यामुळे इथे येणारे लोक उघड्यावर लघुशंका करताना दिसतात.
संकुलातील सर्व गटारी उघड्या तिथे आता फक्त झाडे झुडपे आणि कचरा साठवण्याचे ठिकाण झाले आहे. स्वरूपाच्या आहेत. गटारी वेळोवेळी स्वच्छ न केल्यामुळे येथे डासांची मोठी पैदास झालेली आहे. या डासांचा त्रास या व्यावसायिकांना होतो व दिवसभर मच्छर कॉइल त्यांना लावावी लागते. तसेच गटारीतील दुर्गंधी त्याचप्रमाणे उघड्यावर केलेली लघुशंका याचा दुर्गंध या व्यापारी संकुलात पसरलेला जाणवतो. नगरपालिकेच्या पाण्याचा एकच नळ या संकुलाला असल्याने ते पाणी सर्वांमध्ये कसे पुरेसे होणार ? हा एक प्रश्न आहे. इथे अनेक ठिकाणी वायर उघड्या असल्याने त्याचा करंट बसण्याची भिती आहे. संकुलाजवळ दारूचे दुकान असल्याने सायंकाळी रात्री खुलेआम दारू पिणाऱ्यांचे जथ्थे बसलेले असतात. त्यांचा व्यावसायिक व ग्राहकांना त्रास होतो. वरच्या खोल्यांची वाईट अवस्था आहे. रात्री पार्टी करणाऱ्यांनी टेरेसवरील पाण्याच्या टाकीची मोडतोड केलेली दिसते. टेरेसवर जाणाऱ्या जिन्यावरील रूमची दारे तोडलेली दिसतात. काही ठिकाणची पत्रेच गायब केलेले दिसतात. टेरेसवर झुडपे उगवलेली आहेत. व्यापारी संकुलाचा जो मध्यभाग आहे जिथे कारंजा वैगरे तयार करण्याचा प्लॅन होता
या व्यापारी संकुलामध्ये कुठल्याही प्रकारची सुरक्षितता अथवा सुरक्षा रक्षक नसल्याने कुणीही इथे येऊन मोडतोड करून जातेय. संकुलाला अस्वच्छ आणि विद्युप करून ठेवले आहे. ठिकठिकाणी गुटखा, मावा खाऊन भिंतीवर थुंकून भिंती विद्रुप केल्या आहेत. दारू पिणाऱ्यांनी फेकलेल्या बटाट्याचा येथे खच पडला आहे. येथे जो बोअर घेतला होता, त्या बोअरची मोटार चोरीला गेली आहे. इथे अनेक वेळा व्यावसायिकांची शटर उचकटून चोरीचा प्रयत्न केला आहे तर काही वेळा प्रत्यक्षात चोरी देखील झाली आहे. त्यामुळे इथे सुरक्षित कंपाऊंड, सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही आदी गोष्टींची गरज आहे.
इथे मुख्य प्रवेशद्वार गेट गेली कित्येक वर्ष लावले सुध्दा जात नाही. त्यामे त्याच्यावर झाडाचे वेल तयार झाले आहेत. कॉम्प्लेक्सच्या बाहेर हातगाडीवाल्या व्यावसायिकांना जागा करून दिली आहे, परंतू तिथल्या अस्वच्छतेमुळे, काटेरी झुडूपांमुळे तसेच समोरच विविध पार्क केल्या जाणाऱ्या चारचाकी गाड्यांच्या राड्यामुळे हातगाडी व्यावसायिकांनी तिथे पाठ फिरवली. येथे स्वच्छता नाही, मेन्टेनन्स नाही, सुरक्षा नाही यामुळे इथे मोठ्या उलाढाली करणारे व्यावसायिक व्यापारी येत नाहीत. जर याच व्यापार संकुलाचा अजून चेहरा-मोहरा बदलला, सुरक्षितता, स्वच्छता, सुविधा उपलब्ध करून दिल्या तसेच अपूर्ण राहिलेले संकुलाचे गाळे पूर्ण केले व अजून वरती दोन-तीन मजले बांधले तर त्याचा फायदा व्यावसायिकांना व नगरपालिकेला होऊ शकतो.
त्याच्याच बाजुला जिल्हा क्रिडा संकुलाच्या अधिपत्याखाली जीन मैदान विकसित करण्यात आले, परंतू त्याची अवस्था देखील तितकीच वाईट आहे. इथे फक्त काही राजकीय कार्यक्रम आयोजित केलेतरच त्याची स्वच्छता होते अन्यथा इतर वेळी खेळाडूंना हे मैदान असून अडचण नसून खोळंबा.. झाले आहे. याच्या स्वच्छतागृहांची देखील तितकीच वाईट अवस्था आहे. इथे देखील मोडतोड झालेली पाहायला मिळते. त्यामुळे इथे देखील लोक बाहेरच उघड्यावर लघुशंका करतात. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना बसण्याच्या स्टॅन्डचे नियोजन चांगले असलेतरी त्याचा दर्जा चांगला नसल्याने ते लवकरच बाद होऊ शकते. चांगल्याप्रकारे करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ याबाबी दखल घेऊन सुधारणा करण्यात याव्यात; अशी मागणी व्यापारी व नागरीकांनी केली आहे. संबंधित व्हिडीओ –


