मृतांच्या दागिन्यांवरही चोरट्यांची नजर – स्मशानभूमीत चोरी रोखण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्याची केम ग्रामस्थांची मागणी

केम संजय जाधव) : अंत्यसंस्कारानंतर राख सावडण्याच्या विधीदरम्यान मृत व्यक्तीच्या अंगावरील दागिने आढळून न येण्याच्या…

केम (संजय जाधव) : अंत्यसंस्कारानंतर राख सावडण्याच्या विधीदरम्यान मृत व्यक्तीच्या अंगावरील दागिने आढळून न येण्याच्या घटनांमुळे केम येथील स्मशानभूमीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी असलेल्या अंधाराचा फायदा घेऊन दागिने लंपास केले जात असावेत, अशी शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त होत असून या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.



केम येथे नुकतेच निधन झालेल्या तारामती वसंत तळेकर यांच्या अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी राख सावडण्याच्या विधीसाठी नातेवाईक व ग्रामस्थ स्मशानभूमीत गेले होते. यावेळी अंत्यसंस्काराच्या ठिकाणी राख सावडताना तारामती तळेकर यांच्या अंगावरील एकही दागिना आढळून आला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली.



यापूर्वी याच वर्षात मृत्यू झालेल्या मनीषा स्वप्निल तळेकर तसेच तारामती भालचंद्र मस्तुद यांच्या राख सावडण्याच्या दिवशीही एकही दागिना सापडला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्मशानभूमीत अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याची चर्चा आहे.

गावातील एखाद्या महिलेच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर अंत्यसंस्काराच्या ठिकाणी दागिने असल्याचे समजून संबंधितांकडून हा प्रकार केला जात असावा, अशी शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, या प्रकाराची अधिकृत पुष्टी झालेली नसून याबाबत संबंधित यंत्रणेने चौकशी करणे आवश्यक आहे.



केम येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अंधार असतो. त्यामुळे या परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना स्मशानभूमीकडील हालचाली सहज दिसून येत नाहीत. याच अंधाराचा फायदा चोरट्यांकडून घेतला जात असण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर स्मशानभूमीच्या सुरक्षेसाठी ग्रामपंचायतीने तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच परिसरात पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!