पहिल्या श्रावणी सोमवारी केममध्ये भक्तीचा जागर; उत्तरेश्वर बाबांची पालखी मिरवणूक उत्साहात पार पडली

केम(संजय जाधव): सालाबादप्रमाणे पहिल्या श्रावणी सोमवारी श्री उत्तरेश्वर बाबांची पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली. यानिमित्त पहाटेपासूनच श्री उत्तरेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भाविकांसाठी दर्शनाची रांग लावण्यात आली होती, तसेच भाविकांच्या वतीने मसाले दूध वाटप करण्यात आले.
सकाळी ८ वाजता श्रींचा अभिषेक करण्यात आला. दरम्यान, दौंड मंडळी व मानकऱ्यांनी पालखीची सजावट केली. सकाळी साडेआठ वाजता प्रथेप्रमाणे विजय कुलकर्णी यांनी देवाला फूल लावले. हे फूल पाहण्यासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी ‘बोला पारबत्ते शिवहार हर’ अशा जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.

त्यानंतर श्रींची आरती करण्यात आली. मंदिराचे पुजारी समाधान गुरव यांनी शंखनाद केला. त्यावेळी मानाचे फूल पिंडीसमोर खाली आल्यानंतर विजय कुलकर्णी यांनी ते हातात घेऊन पालखीत ठेवले. त्यानंतर श्री उत्तरेश्वर बाबांच्या पालखीची मंदिरातून मिरवणूक सुरू झाली.

मिरवणुकीत हलगी, सनई-ताफा, शिंगाडे आदी पारंपरिक वाद्यांचा गजर सुरू होता. तब्बल सात तास चाललेल्या या पालखी मिरवणुकीने संपूर्ण केम परिसर भक्तिमय झाला होता. प्रथम पालखी शिवसंभो वेशीजवळील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात पोहोचली. तेथे आरती झाल्यानंतर पालखीने गावात प्रवेश केला.

पालखीच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हजारो भाविकांच्या उपस्थितीत निघालेल्या या मिरवणुकीदरम्यान संपूर्ण केम परिसर हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
पालखी छबिन्याच्या मिरवणूक मार्गावरून दक्षिणेश्वर, केमेश्वर, मदनेश्वर, बसवेश्वर आदी शिवलिंगांची भेट घेत पाटील गल्ली येथे विसावली. त्यानंतर पालखी तीन खणीत येथेही विसाव्यासाठी थांबली. पुढे पालखीने मंदिराकडे प्रस्थान केले.

मिरवणूक मार्गावर भाविकांनी ठिकठिकाणी चहा, मसाले दूध, केळी, सफरचंद आदींचे वाटप केले. या पालखी सोहळ्यासाठी श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, महंत जयंतगिरी महाराज तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालखी मंदिरात परतल्यानंतर श्रींची आरती करण्यात आली आणि पालखी सोहळ्याची सांगता झाली. त्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसाद म्हणून खिचडीचे वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
भाविकांना पाण्याची सोय नसल्याने नाराजी : महाप्रसाद म्हणून खिचडीचे वाटप करण्यात आले असले तरी भाविकांसाठी मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्यात आली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. पाण्याचे जार आणण्यात आले नव्हते तसेच मंदिरातील नळालाही पाणी नसल्याने अनेक भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी घरी जावे लागले. यामुळे भाविकांनी देवस्थान ट्रस्टच्या व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली.

