निंभोरे गावातून विद्यार्थ्यांची मिरवणूक – जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढीसाठी सरपंचांकडून अभिनव उपक्रम

केम (संजय जाधव) : करमाळा तालुक्यातील निंभोरे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविणे, जिल्हा परिषद शाळा टिकवणे आणि शासकीय शिक्षणाला प्रोत्साहन देणे या उद्देशाने निंभोरे ग्रामपंचायतीने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद शाळा व वस्ती शाळेत इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांच्या पालकांची वार्षिक घरपट्टी स्वतः भरणार असल्याची घोषणा सरपंच रविंद्र वळेकर यांनी केली आहे.

नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
चालू शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निंभोरे येथे इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. सजविलेल्या ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. हलगीच्या तालावर निघालेल्या या मिरवणुकीत विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालकांना आवाहन
यावेळी बोलताना सरपंच रविंद्र वळेकर यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात जिल्हा परिषद शाळा टिकविण्याची गरज असल्याचे सांगितले. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेत घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमाचे करमाळा तालुक्यात कौतुक होत असून इतर ग्रामपंचायतींसाठीही हा आदर्शवत उपक्रम असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
केंद्रप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सत्कार
कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद शाळेतील सहशिक्षिका श्रीमती सानप यांची केंद्रप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल निंभोरे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव वळेकर, पंजाब गाडी, प्रेम वळेकर, भीमराव काळजाते, पुंडलिक काळते, गणेश सलगर, अशोक जगताप, पांडुरंग दळवी, श्रीराम काळे, संतोष जगताप, अक्षय वळेकर, आबाभाऊ शिंदे, संजय माळी, नंदू जगताप, भालचंद्र गुरव, सोमा गुरव, जहागीर शेख, नितीन गायकवाड, भोलेनाथ गवळी तसेच शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

