तालुक्यात एक उत्तम शैक्षणिक संकुल उभारणार – रामदास झोळ

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – करमाळा तालुक्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाची एकही संस्था कार्यरत नाही. त्यामुळे करमाळा तालुक्यातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थीनींची कुचंबना होत आहे. ही बाब लक्षात घेऊन तालुक्यात एक उत्तम शैक्षणिक संकुल उभारणार असल्याचे सांगितले. त्यासाठी करमाळा ते देवळाली परिसरात जमीन खरेदी केलेली आहे. वैद्यकिय अभ्यासक्रम तसेच व्यवस्थापन व संगणकीय अभ्यासक्रम करमाळा तालुक्यात उपलब्ध नाहीत. त्यामुळे करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुका सोडून बाहेर जावे लागते. यामुळे गरीब विद्यार्थ्यांना तसेच मुलींना शिक्षणा पासून वंचित रहावे लागते. ही बाब आम्ही लक्षात घेऊन तालुक्यात असे शिक्षण सुरू करण्याच्या दृष्टीने संस्थेने विचार केला आहे. त्यानुसार देवळाली परिसरात की जी जागा शिक्षणासाठी सर्वांना उपयुक्त होईल; अशी खरेदी केलेली आहे. लवकरच शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात येईल; असे वक्तव्य स्वामी चिंचोली (भिगवण) येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व वाशिंबे गावचे सुपुत्र प्रा. रामदास झोळ यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
प्रा रामदास झोळ मित्र परिवाराच्या वतीने प्रा.झोळ यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करमाळा येथील बारा बंगले या ठिकाणच्या संपर्क कार्यालयात करण्यात आले होते. प्रा. रामदास झोळ सर यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून सत्कार करून फोनद्वारे सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
सामाजिक उपक्रमाद्वारे वाढदिवस साजरा
प्राध्यापक रामदास झोळ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रा. रामदास झोळ सर फाउंडेशन करमाळा यांच्या वतीने दुष्काळी परिस्थितीमध्ये वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रमाद्वारे वाढदिवस साजरा करण्यात आला. करमाळा तालुक्यातील बलभिम महाराज बालक आश्रम पांगरे, रत्नप्रभादेवी पाटील आश्रम केम ,जगदंबा कमलाभवानी मुकबधिर निवासी विद्यालय देवीचामाळ करमाळा, ज्ञानप्रबोधन मतिमंद विद्यालय कोर्टी या शाळेमध्ये मिष्टान्न भोजन देण्यात आले तसेच मुक्या प्राण्यांच्या पक्षाच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी वनविभागातील पाणवठे टॅंकरद्वारे भरवुन देण्यात आले असून करमाळा तालुक्यातील दहा गावात 52 बाकडे बसवण्यात आले आहे.पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आपण कार्यरत असून शेतकरी ,कामगार, सर्वसामान्य जनता,विद्यार्थी यांच्या सेवेसाठी आपण कार्यरत राहुन करमाळा तालुक्याचा विकास हाच माझा ध्यास आहे.
–प्रा. रामदास झोळ



