ऍग्रीस्टॅक योजनेसंदर्भात तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी सालसेमधील महिलांना केले मार्गदर्शन

करमाळा(दि.१२) : सालसे (ता. करमाळा) येथे 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त ऍग्रीस्टॅक (Agristack) योजने संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार शिल्पा ठोकडे या होत्या. त्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तहसीलदार ठोकडे यांनी ग्रामीण महिलांना Agristack या महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील महिलांना कृषी क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाची माहिती देणे, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या शेतजमिनींचे व्यवस्थापन कसे सुधरवता येईल हे समजावून सांगणे मुख्य उद्देश या कार्यक्रमाचा होता. महिलांनी Agristack चा अधिकाधिक लाभ घ्यावा असा सकारात्मक संदेश यातून देण्यात आला.
या योजनेची संकल्पना स्पष्ट करताना तहसीलदार म्हणाल्या की Agristack ही केंद्र सरकारची डिजिटल कृषी डाटाबेस प्रणाली आहे, जी शेतकऱ्यांच्या जमिनींची व उत्पादकतेची अचूक माहिती ठेवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना विविध योजना आणि कर्जसुविधांचा थेट लाभ मिळू शकतो. प्रत्येक शेतकऱ्याचा डिजिटल प्रोफाईल तयार होईल. शासकीय योजनांचा थेट लाभ मिळेल.सिंचन, खतपुरवठा आणि पीक विमा यासंदर्भात योग्य माहिती मिळेल. बाजारपेठेतील व्यवहार पारदर्शक होतील आणि अधिक फायदा मिळेल.
या मार्गदर्शन सत्रात अनेक महिलांनी सहभाग घेतला आणि आपल्या शंका उपस्थित करून समाधानकारक उत्तरे मिळवली. विशेषतः, भूमिका महिलांसाठी कृषी वित्तपुरवठा कसा होईल? डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर कसा करायचा? या संदर्भात शिल्पा ठोकडे यांनी अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले.






