सासरवाडीला आलेल्या जावयास पत्नी, मेहूणीसह सासऱ्याकडून बेदम मारहाण

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : सासरवाडीला आलेल्या जावयास सासरे, मेहुणे, मेहुणीसह पत्नीने बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार २३ मे च्या रात्री अकरा वाजता कोर्टी येथे घडला आहे. या प्रकरणी अस्लम लाला मुलाणी (रा.नाव्ही, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
त्या फिर्यादीत म्हटले आहे, की कोर्टी येथे यात्रा असल्याने २३ मे ला मी व माझी पत्नी सलमा असे दुपारी बारा वाजता माझ्या सासरवाडीला आलो. रात्री अकराच्या सुमारास माझी व माझ्या पत्नीची जेवणाच्या कारणावरून किरकोळ वाद झाला असता, मेहुणा सोहेल तय्यब शेख, सासरे तय्यब महंमद शेख, पत्नी सलमा व मेहुणी सना गणीम शेख (सर्व रा. कोर्टी) यांनी दगडाने, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


