रेशन कार्ड वाटपासाठी गावपातळीवरील मोहीम पुन्हा सुरू करण्याची मागणी; औदुंबरराजे भोसले यांचे निवेदन -

रेशन कार्ड वाटपासाठी गावपातळीवरील मोहीम पुन्हा सुरू करण्याची मागणी; औदुंबरराजे भोसले यांचे निवेदन

0
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देताना औदुंबरराजे भोसले

करमाळा (प्रतिनिधी) : पूर्वीप्रमाणे गावपातळीवर राबवली जाणारी रेशन कार्ड वाटपाची मोहीम पुन्हा सुरू करावी, अशी मागणी नेरले (ता. करमाळा) येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना श्री. भोसले म्हणाले की, तहसील कार्यालयामार्फत पूर्वी प्रत्येक पाच वर्षांनी रेशन कार्ड वाटपाची मोहीम राबवली जात होती. तलाठी, स्वस्त धान्य दुकानदार व कोतवाल यांच्या माध्यमातून गावपातळीवर सर्वेक्षण करून नवजात बालकांचे, विवाहानंतर आलेल्या महिलांचे नाव शिधापत्रिकेत समाविष्ट केले जात होते. तसेच नव्याने वास्तव्यास आलेल्यांना नवीन कार्ड दिले जात होते, तर मृत किंवा स्थलांतरित व्यक्तींची नावे वगळली जात होती.



त्या काळात नागरिकांकडून अर्ज भरून शासकीय शुल्क घेऊन शिधापत्रिका वितरित केल्या जात असल्याने तहसील कार्यालयात जाण्याची गरज कमी होत होती. मात्र, सध्या रेशन कार्डसाठी अर्जाधारित पद्धत अस्तित्वात असून नागरिकांना तहसील पुरवठा कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागत आहे. अर्जानंतरही नाव समाविष्ट करणे, कमी करणे किंवा नवीन कार्ड मिळवण्यासाठी विलंब होत असल्याच्या तक्रारी आहेत.


अनेक शिधापत्रिका जीर्ण झालेल्या असून, वृद्ध व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना तहसील कार्यालयात वारंवार जाणे शक्य होत नाही. त्यामुळे काही लाभार्थी शासकीय धान्य व इतर योजनांपासून वंचित राहत असल्याचे भोसले यांनी नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर, पूर्वीप्रमाणे गावपातळीवर विशेष मोहीम राबवून रेशन कार्ड वाटप व नोंद अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी भोसले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!