मांगी तलावातील पाणी हाळगाव कृषी महाविद्यालयाला देण्याच्या निर्णयाविरोधात मांगी व परिसरातील शेतकरी आक्रमक

करमाळा : करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पातील पाणी सुमारे २० किलोमीटर अंतरावरील हाळगाव (ता.जामखेड) येथील कृषी महाविद्यालयाला देण्याचा प्रस्ताव विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेला जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर मांगी तलाव लाभक्षेत्रातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या निर्णयाविरोधात मोठे जनआंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याचे शेतकरी बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

मांगी तलाव हा पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेला मध्यम प्रकल्प असून मांगीसह परिसरातील १० ते १२ गावे तसेच बोरगाव सिंचन योजनेअंतर्गत येणारी गावे या तलावावर अवलंबून आहेत. सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी हा तलाव महत्त्वाचा आधार मानला जातो. मात्र परिसरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत असल्याने तलाव अनेकदा पूर्ण क्षमतेने भरत नाही. गेल्या अनेक वर्षांत केवळ चार ते पाच वेळाच तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

तलावाची क्षमता एक टीएमसी असली तरी उपलब्ध पाणीसाठा उन्हाळ्यापर्यंत टिकत नसल्याने दरवर्षी पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो. अशा परिस्थितीत तलावातील पाणी अन्यत्र वळविण्याचा निर्णय घेतल्यास स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांवर अन्याय होईल, असा आरोप बैठकीत करण्यात आला.
मांगी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात झालेल्या बैठकीत शेतकरी व ग्रामस्थांनी हा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी केली. तसेच पाणी द्यायचेच असल्यास प्रथम मांगी तलावाचा कुकडी लाभक्षेत्रात समावेश करून तलाव वर्षभर पूर्ण क्षमतेने भरण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली.
बैठकीत बोलताना सुजित (तात्या) बागल यांनी निर्णयाविरोधात तीव्र भूमिका मांडली. स्थानिक शेतकरी व प्रकल्पग्रस्तांशी कोणतीही चर्चा न करता घेतलेला निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत त्यांनी लवकरच मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला.
“मांगी तलावातील पाणी अन्यत्र वळविण्याचा निर्णय हा लाभक्षेत्रातील शेतकरी व ग्रामस्थांवर मोठा अन्याय आहे. हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा व्यापक जनआंदोलन उभारले जाईल.”
— सुजित बागल
बैठकीस अशोक नरसाळे, अभिमान अवचर, निखिल बागल, प्रवीण अवचर, संभाजी बागल, ऋषिकेश बागल, सोमनाथ जाधव, सुधाकर नरसाळे, प्रताप बागल, निळकंठ बागल, उमेश बागल, संपत बागल, अनिल बागल, गणेश नरसाळे, वैभव बागल, आशुतोष बागल, रघुनाथ शिंदे, राजेंद्र बागल, कैलास नरसाळे, सुनील बागल, नितीन बागल, अण्णासाहेब बागल, तात्यासाहेब बागल, पंकज बागल, दिलीप शिंदे, अण्णासाहेब राऊत, भैया धुमाळ, सुदर्शन बागल यांच्यासह मांगी पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


