रोपळे–केम–कंदर–कन्हेरगाव रस्त्यासाठी २०० कोटींचा निधी मंजूर-आमदार नारायण पाटील यांची माहिती -

रोपळे–केम–कंदर–कन्हेरगाव रस्त्यासाठी २०० कोटींचा निधी मंजूर-आमदार नारायण पाटील यांची माहिती

0

केम(संजय जाधव): करमाळा आणि माढा तालुक्यांतील नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या रोपळे–केम–कंदर–कन्हेरगाव या सुमारे २५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या विकासासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामास सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार नारायण पाटील यांनी दिली.

निवडणूक प्रचारातील आश्वासनाची पूर्तता

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारादरम्यान आमदार नारायण पाटील केम येथे आले असता, माजी सरपंच अजितदादा तळेकर यांनी गावाच्या विकासासाठी रोपळे–केम–कंदर–कन्हेरगाव रस्त्याची मागणी केली होती. त्यावेळी दोन महिन्यांत रस्ता मंजूर करून देण्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी ग्रामस्थांना दिले होते. आता या रस्त्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने आश्वासनाची पूर्तता झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.



या पार्श्वभूमीवर केम ग्रामस्थांच्या वतीने ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर मंदिरात नारळ अर्पण करून आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच आमदार नारायण पाटील यांचे आभारही मानण्यात आले.


पाच वर्षांपासून नागरिकांची गैरसोय

रोपळे–केम–कंदर–कन्हेरगाव मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाल्याने गेल्या काही वर्षांपासून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, महिला, शेतकरी, नोकरदार आणि व्यावसायिक यांना दैनंदिन प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला प्राधान्य देण्याची मागणी सातत्याने होत होती.

या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आशियाई विकास बँक (ADB) योजनेअंतर्गत या रस्त्याच्या विकासासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

व्यापार व शेतीला मिळणार चालना

या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर करमाळा आणि माढा तालुक्यांतील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. शेतकऱ्यांना आपला कृषीमाल बाजारपेठेत पोहोचविणे सुलभ होईल. तसेच केम येथील प्रसिद्ध कुंकू उद्योगाला चालना मिळून स्थानिक व्यापार आणि बाजारपेठेच्या विकासाला गती मिळणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

यावेळी माजी सरपंच अजितदादा तळेकर, माजी सभापती शेखर गाडे, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर बिचीतकर, सरपंच प्रतिनिधी राहुल कोरे, महंत जयंतगिरी महाराज, श्रीहरी तळेकर, सतीश खानट, समीर तळेकर, सचिन बिचीतकर, गोरख तळेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!